आता रोज अनधिकृत बांधकामांची यादी पाठवणार, कारवाईसाठी पाठपुरावा करणार : शेलार

 माय अहमदनगर वेब टीम

मुंबई  - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात पेटलेला वाद आता विकोपाला गेला आहे. दरम्यान, कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई सुडबुद्धीने करण्याता आली असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच मुंबईत असलेल्या अनधिकृत बांधकामांची यादी आता रोज मुंबई महानगरपालिकेला पाठवणार असून, त्यावर २४ तासांत कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिकेने कंगना राणौतच्या कार्यालयावर हातोडा चालवल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते शेलार म्हणाले की, कंगना राणौतने मुंबईबाबत केलेल्या विधानांचे भाजपा समर्थन करत नाही. मात्र कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई ही सुडबुद्धीने करण्यात आली आहे, असे माझे मत आहे. कंगनाचे कार्यालय जर अनधिकृत असेल तर ते आजचे नाही. मग कारवाईसाठी हीच वेळ का निवडण्यात आली हा प्रश्न आहे. तसेच जर हे अनधिकृत बांधकाम असेल तर त्यावर आधीच कारवाई करता आली असती.

दरम्यान, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व परिसरामध्येही अनेक अनधिकृत बांधकामे आहेत. मात्र महानगरपालिकेने कधी एवढ्या तत्परतेने कारवाई केली नव्हती, आता मुंबईत असलेल्या अनधिकृत बांधकामांची यादी रोज मुंबई महानगरपालिकेला पाठवणार असून, त्यावर २४ तासांत कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार आहोत, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post