प्रश्न सुटण्याच्या तोंडावर आंदोलन ही भाजपची जुनी सवय




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - दूध प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या दोन ते तीन वेळा बैठका झाल्या आहेत. राज्य सरकार दुधासंदर्भात लवकरच धोरण ठरवणार आहे. मात्र, एखादा प्रश्न सुटणार असे दिसताच भाजप त्यावर आंदोलन करते, ती त्यांची जुनीच सवय असल्याची खोचक टीका राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी भाजपने पुकारलेल्या दूध आंदोलनावर केली.

दुधाच्या प्रश्नावर आंदोलन करण्यासोबतच केंद्र सरकार बाहेरून दूध पावडर मागवत आहे, याचा जाब राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकारला विचारावा असा टोलाही त्यांनी लगावला.

जिल्हा रुग्णालयात आ. रोहित पवार यांनी शुक्रवारी भेट देत करोना संसर्ग आणि उपचाराचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नगरसह राज्यातील काही जिल्ह्यांना करोना रुग्णांवर उपचारासाठी गरजेच्या असणार्‍या रेमडिसिव्हर या ऑषधाच्या 50 लसी आणि सॅनिटायझर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सुर्पद केले.

त्यानंतर आ. पवार माध्यमांशी बोलत होते. त्यांनी दूध प्रश्नावर भाजपने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा समाचार घेतला. एखादा प्रश्न मार्गी लावण्याच्या स्तरावर असेल तेव्हा भाजप आंदोलन करत असते. ही भाजपची जूनी सवय आहे. केंद्र सरकार दहा ते पंधरा हजार टन दूध पावडर आयात करणार आहे, त्याबद्दल केव्हा आंदोलन करणार, असा प्रश्नही त्यांनी भाजप नेत्यांसाठी उपस्थित केला.

जेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात तेव्हा भाजपा नेते शांत बसता, असे सांगतानाच सोयीचे राजकारण होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. राज्य सरकारच्या बाबतीत भाजपने काळजी करू नये. राज्य सरकार हे लोकांच्या हिताचे सरकार असून ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘दिल्ली’वाल्यांना लोणी लावण्यासाठी बोलले असतील !
भाजपला सल्ला देण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दररोज भूमिपूजन व उद्घाटन करणार्‍या मंत्री व आमदारांना थांबवावे, असे वक्तव्य खासदार डॉ.सुजय विखे यांनी नगरमध्ये बोलताना केले होते. त्याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, दिल्लीच्या प्रमुख नेत्यांना खूश करण्यासाठी ते तसे बोलले असतील. मुळात शरद पवार यांनी भूमिपूजनाबाबत जे वक्तव्य केले होते, त्याला कारणे वेगळी होती. भूमिपूजनासाठी अयोध्येत गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. गर्दी झाली तर करोनाच्या काळात तेथे येणारे भाविकांना त्याचा त्रास होवू शकतो, असा शरद पवार यांच्या मुद्दा होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post