खासदार निलेश लंके आणि जनतेच्या दबावामुळे माळीवाडा वेसवरील निर्णय स्थगित



माय नगर वेब टीम

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहराच्या ऐतिहासिक वारशाशी संबंधित माळीवाडा वेस निष्कासित करण्याच्या निर्णयावर अखेर स्थगिती देण्यात आली असून, या निर्णयामागे नागरिकांचा तीव्र विरोध आणि खासदार निलेश लंके यांच्या ठाम हस्तक्षेपाचा मोठा प्रभाव राहिला आहे. वाढत्या जनदबावामुळे महापालिका आयुक्तांना हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे.


माळीवाडा वेस पाडण्याच्या प्रस्तावाविरोधात शहरातील नागरिक, इतिहासप्रेमी, अभ्यासक तसेच विविध सामाजिक संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली होती. नागरिकांच्या भावना लक्षात घेत खासदार निलेश लंके यांनी या प्रकरणात सक्रिय हस्तक्षेप करत प्रशासनासमोर स्पष्ट भूमिका मांडली. वाहतूक कोंडीच्या कारणावर आधारित निर्णयामुळे अहिल्यानगरचा मौल्यवान ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा धोक्यात येईल, असा ठाम मुद्दा त्यांनी उपस्थित केला.


या संदर्भात खासदार लंके यांनी केंद्र सरकारच्या पुरातन व ऐतिहासिक वारसा खात्याशी तसेच राज्य शासनातील संबंधित विभागांशी संवाद साधून अहिल्यानगरच्या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले. ऐतिहासिक वारसा जपणे हे शासनाचे कर्तव्य असून, अशा वास्तू नष्ट करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


नागरिकांकडून दाखल झालेल्या हरकती, प्रसारमाध्यमांमधून उमटलेली चर्चा आणि खासदार निलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण मध्यस्थीमुळे अखेर महापालिकेने यापूर्वी जाहीर केलेल्या सूचनेवर कार्यवाही स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अहिल्यानगरकरांच्या जनभावनेचा आणि सार्वजनिक हिताचा विजय मानला जात आहे.


अहिल्यानगरच्या ऐतिहासिक ओळखीचे रक्षण करण्यासाठी नागरिक आणि लोकप्रतिनिधी एकत्र आले तर प्रशासनालाही निर्णय बदलावा लागतो, हे या प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, हा निर्णय भविष्यातील वारसा संवर्धनासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post