प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मंगळवारी लोकार्पण



अनावरण सोहळ्यासाठी महानगरपालिकेकडून नियोजन सुरू

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर - सर्व नगरवासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण होऊन पुतळा महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झाला आहे. येत्या मंगळवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता या पुतळ्याचे भव्य सोहळ्यामध्ये अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.


आमदार संग्राम जगताप व आयुक्त यशवंत डांगे यांनी रविवारी प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या नियोजित स्मारकाची पाहणी करून सोहळ्यासाठी नियोजनाच्या सूचना दिल्या. मंगळवारी दुपारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते व या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी खासदार निलेश लंके, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजित तांबे, आमदार शिवाजीराव गर्जे, माजी खासदार सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


प्रोफेसर चौकात पुतळ्यासाठी १८ फूट उंचीचा चबुतरा बनवण्यात आला आहे. त्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा १२ फूट उंचीचा ब्राँझचा सुमारे ८०० किलो वजनाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळा अहिल्यानगर शहरात दाखल झाला आहे. स्मारकाची संरक्षक भिंत, सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण होणार असून, या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post