माय अहमदनगर वेब टीम
चिनी अॅपविरुद्ध जगभरातील रोष पाहता अमेरिकेतही टिकटॉकसारख्या प्रसिद्ध अॅपवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. यामुळे चीनने टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय विकण्याची तयारी केली आहे. दिग्गज टेक कंपनी मायक्रोसाॅफ्टने यसाठी तयारी दर्शवली असून टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्ससोबत याबाबत चर्चा सुरू आहे. हा व्यवहार झाला तर मायक्रोसॉफ्ट कंपनी सोशल मीडियातील एक दिग्गज बनू शकते.
ब्लूमबर्गनुसार मायक्रोसॉफ्ट व इतरही कंपन्यांनीही टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय खरेदी करण्यात रस दाखवला आहे. अमेरिकेत टिकटॉकचे मूल्य २० ते ४० बिलियन डॉलर (१.५ लाख कोटी ते ३ लाख काेटी रुपये) रुपये असू शकते. दरम्यान, एकीकडे टिकटॉकच्या विक्रीची चर्चा सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटाॅकवर बंदी घालणार असल्याचे सांगून लवकरच याबाबत आदेश काढले जातील, असे स्पष्ट केले.
टिकटॉक अमेरिकेत चौकशीच्या फेऱ्यात
भारताने जूनमध्ये टिकटाॅकवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेतही टिकटॉकच्या अडचणींत वाढ झाली आहे. लाखो अमेरिकींची खासगी माहिती चोरल्याचा आरोप या अॅपवर आहे. याची ट्रम्प प्रशासन चौकशी करत आहे. अमेरिकी हवाईदलानेही गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना हे अॅप डिलीट करण्यास सांगितले होते.
टिकटॉकचे अमेरिकेत एकूण १६.५ कोटी युजर
टिकटॉक अमेरिकेतील व्यवसायाची वाटणी कशी करेल याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी याचा कर्मचारी, तंत्रज्ञान व उत्पादनावर काय परिणाम होईल हेही कंपनीने स्पष्ट केलेले नाही. युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या टिकटॉकचे अमेरिकेत सध्या १६.५ कोटी युजर आहेत. यातील निम्मे युजर सक्रिय आहेत.
Post a Comment