जगातील सर्वाधिक रुग्णवाढ भारतात

 

माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - भारतात कोरोना विषाणूमुळे बाधितांचा आकडा आता आणखी भीतीदायक होताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात उच्चांकी 3 लाख 28 हजार 903 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ही संख्या या काळातील अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही अधिक आहे. कोरोना रुग्णसंख्येबाबत जगात पहिल्या क्रमांकावर असणार्‍या अमेरिकेलाही भारताने या कालावधीत मागे टाकले आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 6 दिवसांमध्ये देशात 3 लाख 28 हजार 903 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर अमेरिकेत सहा दिवसांमध्ये 3 लाख 26 हजार 111 रुग्णांची नोंद झाली. याच कालावधीत ब्राझीलमध्ये 2 लाख 51 हजार 264 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट रोजी जगातील सर्वाधिक रुग्णांची नोंद भारतात झाली. तर गुरुवारीच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 20 लाखांचा टप्पा पार केला.

गेल्या 9 दिवसांपासून भारतात सातत्याने 50 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारीही गेल्या 24 तासांत कोरोनाचे 61 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळल्यामुळे देशातील एकूण बाधितांची संख्या आता 21 लाखांच्या 

जवळपास पोहोचली आहे. शुक्रवारी उच्चांकी 62 हजार 538 लोक पॉझिटिव्ह आढळले होते. ऑगस्ट महिन्यात भारतात आतापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. कोरोनामुळे सुरुवातीच्या सहा दिवसांमध्ये अमेरिका आणि ब्राझीलमध्ये 6 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे भारतात 5 हजार 075 जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधील वाढती रुग्णसंख्या देशाच्या चिंतेत आणखी भर घालत आहे.

शुक्रवारी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये 10 हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. बिहार, तेलंगणा, ओडिशा, पंजाब आणि मणिपूरमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली.

मुंबईची स्थिती काहीशी सुधारतेय शुक्रवारी महाराष्ट्रात 10 हजारांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 300 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या 4 लाख 90 हजार 262 वर पोहोचली. याव्यतिरिक्‍त राज्यात आतापर्यंत 17 हजारांपेक्षा अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे. मुंबईतदेखील शुक्रवारी 1 हजारपेक्षा कमी रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईतील स्थिती काही प्रमाणात सुधारत असल्याचे दिसून येत आहे.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये  भारत तिसर्‍या स्थानी

आकडेवारीनुसार, देशात सध्या 6 लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात असून, सव्वा लाखापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि दिल्ली यांचा त्यानंतर नंबर लागतो. या पाच राज्यांत सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत जगात भारत तिसर्‍या स्थानी आहे.

आंध्र प्रदेश तिसर्‍या क्रमांकावर

आंध्र प्रदेशातही शुक्रवारी 10 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 2 लाख रुग्णसंख्या पार करणारे आंध्र प्रदेश हे तिसरे राज्य ठरले आहे. आंध्र प्रदेशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 2 लाख 6 हजार 960 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये आंध्र प्रदेशपेक्षा रुग्णसंख्या अधिक आहे. 12 मार्च रोजी या ठिकाणी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर जवळपास 135 दिवसांमध्ये ही संख्या 1 लाखाच्या पुढे गेली होती.


...तर 30 दिवसांत भारत असेल सर्वात पुढे

कोरोना संक्रमणाची स्थिती ज्या वेगाने वाढत आहे, त्यावरून येत्या 30 दिवसांत जगातील सर्वाधिक बाधितांच्या संख्येत भारत सर्वात पुढे असण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. जॉन हॉपकिन्स कोरोना रिसोर्स सेंटरच्या अहवालानुसार, अमेरिकेत सध्या 48 लाख 83 हजार 567 रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे ब्राझीलमध्ये 29 लाख 12 हजार 212 रुग्ण आहेत. भारतात 30 दिवसांत 15 लाख नवे रुग्ण आढळल्यास ब्राझीलही पिछाडीवर पडेल.


देशातील बाधितांचा आकडा 21 लाखांजवळ

महाराष्ट्र, आंध्रमधील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक

मुंबईतील स्थितीत होतेय काही प्रमाणात सुधारणा

वेग कायम राहिल्यास 30 दिवसांत भारत सर्वात पुढे


सहा दिवसांतील रुग्णसंख्या

भारत     3,28,903 

अमेरिका    3,26,111

ब्राझील    2,51,264

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post