प्रियांकांच्या मध्यस्थीने सचिन पायलटांचे काँग्रेसमध्येच सेफ लँडिंग होण्याचे संकेत!


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर घोंघावत असलेलं  संकट दूर होण्याची चिन्हे आहेत. पक्षात बंडखोरी केलेल्या राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली. या भेटीत पायलट यांनी भविष्यात राजस्थानमध्ये सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, अशी ग्वाही दिल्याचे सूत्रांकडून समजते. 

राजस्थान सरकार पाडण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप आणि आमदारांच्या घोडेबाजाराने घेरलेले माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी त्यांचा विरोध काँग्रेस नव्हे, तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना असल्याचे स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांना पक्षात सन्मान राखण्याचे आश्वासन दिले आहे. राजस्थान विधानसभेचे अधिवेशन १४ ऑगस्टपासून सुरू होईल तेव्हा पक्षात सामान्यता दिसून येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

नाव न घेण्याच्या अटीवर सचिन पायलट यांचे समर्थन करणारे नेते सांगतात की ते काँग्रेसच्या नेतृत्वाशी संपर्कात आहेत आणि राजस्थानच्या राजकीय परिस्थितीवर लवकरच तोडगा काढला जाईल, असे पक्षाने आश्वासन दिले आहे.

प्रियांका यांची यशस्वी मध्यस्थी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस सातत्याने सचिन पायलट यांच्या बंडखोर गटाशी संपर्कात होत्या. सचिन पायलट आणि राहुल गांधी झालेली भेट त्याचेच फलित आहे. सूत्रांनी सांगितले की, उभय गट सलोख्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. प्रियांका यांनी उभय नेत्यांच्या भेटीची पार्श्वभूमी निश्चित केली होती. यापूर्वी त्यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली होती, पण त्यावेळी चर्चा निष्फळ ठरली होती. सचिन पायलट गहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकण्यावर ठाम होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post