मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपचाही ‘घंटानाद


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - राज्यातील धार्मिकस्थळे आणि मंदिरे सुरू करण्यासाठी राज्यभरातील धार्मिक संघटना एकवटल्या आहेत. या धार्मिक संघटनांनी २९ ऑगस्ट रोजी राज्यभर घंटनाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून भाजही या आंदोलनात सहभागी होणार असल्याने मंदिरे सुरू करण्यासाठीचा ठाकरे सरकारवरील दबाब वाढला आहे.

मंदिरे सुरू करा, या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. आध्यात्मिक समन्वय आघाडीने या आंदोलनाची हाक दिली आहे. भारतीय जनता पक्षाचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होताना फेस मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे इत्यादी कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करावे, अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केली आहे.

केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे व देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरू देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरू करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली. सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही. ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरु करा या मागणीसाठी राज्यभर ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत घंटानाद आंदोलन विविध धार्मिक संस्था व संघटनांतर्फे होणार आहे. या आंदोलनाला भाजपा पूर्ण पाठिंबा देत आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील, असे सांगतानाच तीर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. त्याचाही राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post