बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांचे एक वर्षापासून पगार नाही


माय अहमदनगर वेब टीम
श्रीरामपूर - श्रीरामपूर येथील भारत संचार निगमच्या कार्यालयात कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या कामगारांना एक वर्षापासून पगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लवकरात लवकर पगार झाले नाही तर सदरचे कंत्राटी कामगार कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा या कामगारांच्यावतीने देण्यात आला आहे.

तालुक्यातील टाकळीभान, माळवाडगाव, उंदिरगाव, नाऊर, पढेगाव, बेलापूर, अशोकनगर येथे प्रत्येक दुरध्वनी एक्सचेंजला एक तर श्रीरामपूरलातीन कंत्राटी कामगार काम करतात. या एक्सचेंजमध्ये यापूर्वी लाईनमन काम करत होते. मात्र यातील काही लाईनमन हे सेवानिवृत्त झाले तर काहींनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

याचा कामाचा ताण सर्व कंत्राटी कामगारांवर पडला आहे. या कामगारांना महिन्यापासून फक्त पंधरा दिवस कामावर बोलावले जाते. प्रतिदिन 400 रुपये प्रमाणे पगार दिला जातो. परंतु एक वर्षापासून कंत्राटी कामगारांना पगारच मिळाला नसल्याने संतापाची लाट पसरली आहे. यापैकी कंत्राटी कामगारांना दोन एक्सचेंजचे काम पहावे लागते.

येथील भारत संचार निगमच्या कार्यालयात सुरक्षा रक्षक अंतर्गत सफाई कामगार व कंत्राटी कामगार यापूर्वीही भरले होते. सुरक्षा रक्षकांनाही दीड वर्षापासून पगार नाही. सर्व सुरक्षा रक्षकांनी कामावरुन कमी करण्यात आले आहे. सुरक्षा रक्षकांचे प्रकरण 2006 पासून न्यायालयीन प्रविष्ट असूनही त्यांना कामावरुन कमी केलेच कसे? असा सवाल सुरक्षा रक्षकांनी केला आहे.

हा न्यायालयाचा अवमान नाही? असा सवालही त्यानी केला. वास्तविक शासनाचा नियम असा आहे की, किमान चार वर्षे एका ठिकाणी काम केल्यावर समान काम समान वेतन या तत्वावर या कामगारांना कायमस्वरुपी ऑर्डर देवून कामावरुन कमी करता येत नाही. मात्र या कार्यालयात या आदेशाचे उल्लंघन केले आहे.

येथील भारत संचार निगमच्या कार्यालयात सुरक्षा रक्षक नसल्याने कोट्यावधीची मालमत्ता बेवारस पडली आहे. बीएसएनलला अच्छेदिन कधी येतील? असा सवालही ग्राहक करत आहेत. पूर्वीपेक्षा दुरध्वनी ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. श्रीरामपूर शहर व तालुक्यात अनेकांनी इतर कंपनीची मोबाईल सेवा मिळत असल्याने बीएसएनएलचे दुरध्वनी व मोबाईल बंद केले आहेत. अजूनही बीएसएनएलने इतर कंपन्यांप्रमाणे उत्कृष्ट सेवा दिल्यास ग्राहक वाढतील.

कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक, हाऊसकिंपींग यांचे पगार न झाल्याने त्यांना आर्थिक संकटास तोंड द्यावे लागत आहे. तरी या प्रश्नात खा. डॉ. सुजय विखे पा., खा. सदाशिव लोखंडे, यांना संबंधित मंत्र्यांना भेटून संसदेच्या अधिवेशनात याप्रश्नी आवाज उठवावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post