'या' परीक्षेचे भवितव्य समितीवर अवलंबून


माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणार्‍या अनुक्रमे जेईई मेन आणि नीट या परीक्षांचा करोना स्थितीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपल्या शिफारशी लवकरच नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाला देणार आहे. यानंतर या दोन्ही परीक्षा होणार वा नाही यासंदर्भातील निर्णय जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेईई व नीट परीक्षेचे भवितव्य सध्यातरी समितीवर अवलंबून आहे.

करोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थी हित लक्षात घेऊन या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या पाहिजे, अशी मागणी जेईई परीक्षेला बसलेले विद्यार्थी, पालकांकडून सातत्याने होत आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले की, एनटीएच्या महासंचालकांना मी विनंती केली होती. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमावी. बैठकीत ठोस निर्णय घेतला जावा आणि शिफारशी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडे पाठवाव्यात. जेणेकरून मंत्रालय या परिस्थितीत परीक्षांसंदर्भातील एक ठोस निर्णय घेईल.

कमिटी ज्या शिफारशी देईल त्यावर विचार करून त्यानंतरच नीट आणि जेईई मेन परीक्षांसंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती निशंक यांनी दिली. आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी जेईई मेन ही परीक्षा होते. त्यात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरतात. जेईई मेन १८ ते २३ जुलै २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट ही परीक्षा घेतली जाते. सुमारे १६ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post