कामापासून वंचित ठेवल्याने दिव्यांगावर उपासमारीची वेळ


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- रोजगार हमी योजनामध्ये दिव्यांग बांधवांना काम द्यावे असे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्त व रोजगार हमी आयुक्त यांनी काढले आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील बेरोजगार दिव्यांगांना जॉब कार्ड देण्याची प्रक्रीया सुरु झाली असली. परंतु दिव्यांगांना फक्त जॉब कार्ड देण्यात आले असून, त्यांना काम मिळत नसल्याचा आरोप सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी केला आहे.

कोरोनाच्या संकटकाळात दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली असून, दिव्यांगांना रोजगार मिळणेबाबत त्वरीत स्वतंत्र आराखडा तयार करून दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणीचे निवेदन रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी, उप मुख्यकार्यकारी अधिकारी मनरेगा यांना संस्थेच्या वतीने देण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. प्रत्येकाचा रोजगार हीरावला गेला असून, जीवन जगणे देखील असह्य झाले आहे. कोरोना काळात दिव्यांगांना काम नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

शासन फक्त कागदी घोडे नाचवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.जॉब कार्ड मिळाले नंतर दिव्यांग व्यक्ती संबधीत ग्रामसेवक किंवा रोजगार सेवक यांच्याकडे कामाची मागणी करण्यासाठी गेले असता दिव्यांगांना कोणते काम द्यावे? अशा सुचना आम्हाला नसल्याने आम्ही तुम्हाला काम देवू शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये शासनाच्या या धोरणा विषयी तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. जिल्हा रोजगार हमी योजनेने दिव्यांगांना रोजगार मिळणेबाबत त्वरीत स्वतंत्र आराखडा तयार करून दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. हाताला काम नसल्याने दिव्यांगांची उपासमार चालु आहे. उपासमारीने कोणत्याही दिव्यांगांचा बळी जावू नये. याची खबरदारी शासनाने घेवून दिव्यांगांना त्वरीत रोजगार हमीचे काम उपलब्ध करून देण्याचे बाबासाहेब महापुरे यांनी म्हंटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post