शेतकर्‍यांना कर्जमाफीचे मिळाले दीड हजार कोटी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा जिल्ह्यातील आतापर्यंत 2 लाख 45 हजार शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे. या शेतकर्‍यांच्या विविध बँकांच्या कर्ज खात्यावर 1 हजार 521 कोटी रुपये जमा झाले आहेत. राज्यात उद्धव ठाकरेे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सरकारने शेतकर्‍यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली. त्यानुसार राज्यभरात त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकर्‍यांची यादी तयार करून सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जात होते. ‘लॉकडाऊन’मुळे तीन महिने प्रक्रिया थंडावली होती. लॉकडाऊन शिथिल होऊ लागताच पुन्हा लाभार्थी शेतकर्‍यांची यादी अंतिम करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 45 हजार 553 शेतकर्‍यांचा कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या खात्यावर 1 लाख 521 कोटी 40 लाख रुपये जमा झालेले आहेत.

पात्र लाभार्थ्यांनी जी यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेली आहे. त्या यादीतील सुमारे 83 टक्के शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे. पात्र लाभार्थ्यांच्या यादीत ज्या-ज्या शेतकर्‍यांचे नाव समाविष्ट आहे, त्या प्रत्येक लाभार्थी शेतकर्‍यांनापर्यंत योजनेचा लाभ मिळेपर्यंत योजनेची अंमलबजावणी सुरू राहील, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे.

पीककर्ज व शेतीशी संबंधित कर्ज घेतलेल्या व ज्यांचे नाव कर्जमाफीच्या पात्र लाभार्थी शेतकर्‍यांच्या यादीत समाविष्ट आहे, मात्र अद्यापर्यंत लाभ मिळालेला नाही, अशा शेतकर्‍यांचा लाभ देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व बँकांना दिले आहेत. काही महिने थंडावलेले प्रमाणीकरणाचे काम पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे कर्जमाफी अंमलबजावणी प्रक्रियेने वेग घेतला आहे.

प्रक्रिया झाली पुन्हा सुरू

कर्जमाफी योजनेअंतर्गत तयार केलेल्या यादीतील खातेदारांनी त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर त्यांना लाभ मिळून त्यांच्या कर्जखात्यावर रक्कम जमा होते. मार्च 2020 मध्ये राज्यातील काही जिल्ह्यांत निवडणूक जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली होती. त्यानंतर ‘कोविड-19’ या महामारीमुळे  काही ठिकाणी शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ देणे शक्य झाले नव्हते. परंतु, आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post