नगर शहर परिसरात अतिवृष्टी; सीना नदीला आला पुन्हा पूरमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर शहर व परिसराला गुरुवारी (दि.23) सायंकाळनंतर मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. शहर परिसरात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यातील हा सर्वात जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे सिना नदीला पुन्हा मोठा पूर आल्याचे पहावयास मिळाले. शहर व परिसरात गुरुवारी सायंकाळी 7 च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने शहराच्या विविध भागात काही वेळातच मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शहरातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले होते. केडगाव उपनगर परिसरात सर्वाधित 87.8 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ सावेडी परिसरातही 76.3 मिमी पाऊस कोसळला आहे. भिंगार परिसरात 65.8 मिमी पाऊस झाला. त्यामुळे या तिनही मंडलात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.

नालेगाव परिसरात 58.8 मिमी, नागापूर परिसरात 46.3 मिमी, पाऊस कोसळला आहे. नगर तालुक्यातील कापूरवाडी मंडलातही अतिवृष्टीची नोंद झाली असून तेथे 72.8 मिमी तर चास मंडलात 73.5 मिमी पाऊस झाला आहे. जेऊर मंडलात 75.3 मिमी, चिचोंडी पाटील मंडलात 47 मिमी, वाळकी मंडलात 61.3 मिमी, रुईछत्तीशी मंडलात 28.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नगर शहरासह तालुक्यात सरासरी 63 मिमी पाऊस रात्रभरात कोसळला आहे. सायंकाळी 7 वाजता सुरू झालेला पाऊस रात्रभर कमी-अधिक प्रमाणात कोसळत होता.

कल्याणरोडवरील वाहतूक तीन तास ठप्प

शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सिना नदीला पुन्हा मोठा पूर आला होता. कल्याण रोडवर असलेला सिना नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने शुक्रवारी (दि.24) पहाटे 5 ते सकाळी 8 अशी तीन तास वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. सकाळी 8 नंतर पाणी ओसरायला सुरुवात झाली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या पावसामुळे शहराच्या विविध सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे तळे साचले होते. शहरातील ओढे-नाले तुडंब भरुन वाहत होते. कल्याण रोडवरील गणेशनगर कॉलनीतील मुख्य रस्त्यावर पाण्याचे तळे साचल्याने नागरिकांना व दुचाकीस्वारांना रस्ता ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. अशीच परिस्थिती शहराच्या अनेक भागात पहावयास मिळत होती. शहर परिसरात गुरुवारी रात्री झालेला पाऊस यावर्षीच्या पावसाळ्यातील विक्रमी पाऊस झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या नोंदीवरुन स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अतिवृष्टी

नगर शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसाप्रमाणे जिल्ह्याच्या अनेक भागातही अतिवृष्टीची नोंद झाली आहे. संगमनेर व पाथर्डी तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे – नगर 63 मिमी, पारनेर 51.2 मिमी, श्रीगोंदा 47.3 मिमी, कर्जत 13.4 मिमी, जामखेड 6.9 मिमी, शेवगाव 54.09 मिमी, पाथर्डी 71.8 मिमी, नेवासा 36.2, राहुरी 38.6, संगमनेर 81.3, अकोले 45.1, कोपरगाव 33.9, श्रीरामपूर नगर शहर परिसरात अतिवृष्टी; सीना नदीला आला पुन्हा पूर 21.7, राहाता 31.8 मिमी असा जिल्ह्यात सरासरी 46.4 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेबर या चार महिन्यांच्या कालावधीत पडणार्‍या पावसाच्या सरासरी 78.9 टक्के पाऊस यावर्षी दोन महिन्यातच झाला आहे. त्यामुळे यावर्षी पाऊस सरासरीच्या अनेक पटींनी जास्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बुरूडगावमध्ये पिकांचे मोठे नुकसान

शहर आणि परिसरात गुरूवारी (दि.23) झालेल्या जोरदार पावसामुळे सीना नदीला महापुर आला आहे. शुक्रवारी (दि.24) सकाळी या पुराचे पाणी बुरूडगावमध्ये घुसले. या पुरात बुरूडगावातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन गावाचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहर आणि परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह जोरदार पावसास सुरूवात झाली. साधारण मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सीना नदीला महापुर आला. शुक्रवारी सकाळी या पुराचे पाणी नगर-बुरूडगाव दरम्यान पुलावरून पडले. पाणी पातळी वाढत जाऊन पुराचे पाणी गावात तसेच नदीलगतच्या शेतामध्ये घुसले.

या पुरामुळे शेतातील घास, मका, ऊस कडवळ या चार पिकांसह बाजरी, मुग ही पिके भुईसपाट झाली. सर्व पिके पाण्यात गेल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे शुक्रवारी दुपारी कृषी अधिकारी आणि तलाठी यांनी संयुक्त पाहणी केल्याची माहिती माजी सरपंच बापुसाहेब कुलट यांनी दिली. सीनाच्या पुरामुळे बुरूडगावचा नगर शहराशी संपर्क तुटला आहे. दुपारपर्यंत पुलावरून पाणी वाहत होते. त्याचबरोबर बुरूडगावहुन आझादनगर, व्हीआरडीई मार्गे येणार्‍या रस्त्यावरही संरक्षक भिंत कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. तसेच बुरूडगावहुन कायनेटिक कंपनी शेजारून जाणारा रस्ताही बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे बुरूडगाव परिसरातील ओढे, नाले आणि तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post