‘सारथी’ला तातडीने आठ कोटी


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी सुरु केलेल्या सारथी संस्थेला तातडीने आठ कोटींचा निधी दिला जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. यावेळी पत्रकार परिषदेला खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सारथी संस्था बंद होणार नाही. मागील काही काळात गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये चुकीचा मेसेज गेला होता. मात्र, हे होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात येईल. त्याचबरोबर सारथीला उद्याच विजय वडेट्टीवार हे आठ कोटी रुपयांची मदत देतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. सारथीची बैठक गुरुवारी पार पडली. बैठकीत काहीही गोंधळ झालेला नाही. तसे असते तर आम्ही एकत्र आलोच नसतो, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान महाविकास आघाडी सरकारने सारथी संस्थेकडे दुर्लक्ष केले असून मराठा समाजाच्या हितासाठी काम करणारी ही संस्था बंद करण्याचा डाव आहे, असा आरोप मराठा संघटनांनी केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नसल्याचे संभाजीराजे भोसले यांनी म्हटले होते. सारथी संस्थेबाबतचा पोरखेळ थांबवा, सरकारच्या आश्वासनांचे काय झाले? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता. या सगळ्या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष बैठक बोलावली होती. संभाजीराजे यांच्यासह मराठा समाजातील महत्वाच्या प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होते.

सारथी संस्थेच्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसर्‍या रांगेत स्थान देण्यात आले होते. त्यावरून उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या समन्वयकांनी यासंदर्भात आक्षेप नोंदवला आणि सभेमध्ये गोंधळ झाला. यादरम्यान, संभाजीराजे छत्रपतींनी सामंजस्याची भूमिका घेत परिस्थिती शांतपणे हाताळली. अशातच या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत बैठकीतील गोंधळ मिटवला. दरम्यान, सभागृहात झालेल्या गोंधळानंतर बैठक सभागृहात न घेता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात संभाजीराजे छत्रपतींसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली.

यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, माझ्या हॉलमध्ये सगळी लोक बसू शकत नाहीत. त्यामुळे हॉलमध्ये गेलो होतो. पण, चांगला निर्णय घेणे महत्त्वाचे की त्याला वेगळे फाटे फोडायचे हे बघा. ते म्हणाले, आता दर दोन महिन्यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल. सारथी संस्था चांगल्या पद्धतीने काम करेल. आजच्या बैठकीत त्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली आहे. सारथी संस्थेने केलेला सगळा खर्च संस्थेच्या संकेतस्थळावर देण्याची सूचना केली आहे, असे अजित पवार म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post