लॉकडाऊनबाबत दोन दिवसांत निर्णय?माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरात गेल्या आठवडाभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी व रविवारी दोन दिवसांत सुमारे 70 नवीन रुग्ण शहरात सापडले आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास दोन दिवसांत मोठा निर्णय घ्यावा लागेल, अशा शब्दांत महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्याची वेळ आल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दरम्यान, मनपाने लक्ष्मीकारंजा, चितळेरोड परिसर 25 जुलैपर्यंत कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे.

शनिवारी (दि.11) जिल्ह्यात एकाच दिवसांत 90 रुग्ण आढळून आले. तर रविवारी (दि.12) खासगी प्रयोगशाळेच्या 23 रुग्णांची व जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील 6 अशा 29 रुग्णांची भर पडली. यात नगर शहरातील सुमारे 70 जणांचा समावेश आहे. लक्ष्मीकारंजा परिसरात 6 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे तेथील परिसर मनपाने सील केला आहे. तसेच सातभाई मळा परिसरात 5 रुग्ण आढळून आले आहेत. श्रमिकनगर येथे 5, भिस्तबाग चौक परिसरात एकाच परिवारातील सुमारे 10 ते 12 जण कोरोना बाधित आढळले आहेत. या सर्व भागात आयुक्‍त मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे व नोडल अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी पाहणी केली. लक्ष्मीकारंजा परिसर कन्टेन्मेंट करण्यात आला असून, भिस्तबागसह इतर परिसरांबाबत उद्या (दि.13) निर्णय होईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, शहरातील वाढत्या रुग्णांबाबत आयुक्‍त मायकलवार यांनी चिंता व्यक्‍त केली आहे. अशाच पध्दतीने रुग्णांची संख्या वाढत असेल आणि नागरिक नियमांचे पालन करणार नसतील तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन दिवसांत मोठा निर्णय घ्यावाच लागेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या अशीच वाढली, तर संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होईल, असे चित्र आहे.

भिस्तबाग कन्टेन्मेंटबाबत आज आदेश?

भिस्तबाग चौक परिसरातील एका वसाहतीत एकाच परिवारातील सुमारे 10 ते 11 जण कोरोना बाधित आढळले आहेत. या भागाची आयुक्‍त मायकलवार व अधिकार्‍यांनी रविवारी (दि.12) पाहणी केली. या भागात कन्टेन्मेंट झोन करण्याबाबत महापालिकेकडून आज निर्णय घेण्यात येणार आहे. आयुक्‍तांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.

393 कोरोना बाधित; 280 अहवाल प्रलंबित

रविवारी पुन्हा शहरात चार रुग्ण आढळले आहेत. यात एक पाईपलाईन रोड व तीन सर्जेपुरा भागातील आहेत. दरम्यान, शहरात आजपर्यंत 393 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या 185 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच रविवारी 40 जणांचे स्त्राव संकलित करण्यात आले असून, 280 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर या सर्व 280 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.

शहरात रॅपिड अँटीजेन टेस्टला सुरुवात

आयसीएमआरच्या मार्गदर्शक निर्देशानुसार शहरात रॅपिड अँटीजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून मनपाला 200 किट उपलब्ध झाल्या आहेत. कन्टेन्मेंट झोनमधील नागरिकांची जागेवरच प्राथमिक तपासणी या माध्यमातून केली जात आहे. यात पॉझिटिव्ह असेल तर खात्री करण्यासाठी स्त्राव तपासणी केली जाणार असल्याचे नोडल अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी सांगितले.

लक्ष्मीकारंजा कन्टेन्मेंट झोन :

चितळे रोड, मिरावलीबाबा दर्गा चौक, लक्ष्मीकारंजा चौक, चित्रा टॉकीज, जिल्हा वाचनालय, चितळे रोड - मिरावलीबाबा दर्गा चौक.

लक्ष्मीकारंजा बफर झोन :

पापय्या गल्ली, रंगारगल्ली, पटवर्धन चौक, धनगरगल्ली, महाजनगल्ली, घुमरेगल्ली, गांधी मैदान, नवीपेठ, नेतासुभाष चौक, जगदीशभुवन मागील परिसर, कुंभारगल्ली, जुनी छाया टॉकीज परिसर, नेहरुमार्केट ते पटवर्धन चौक.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post