जग जिंकलं ‘त्या’ माऊलीच्या मायेने!


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - आईची तिच्या लेकराबद्दल असणारी माया ही जगात सर्वोच्च मानली जाते. आपल्या तान्हुल्यासाठी रायगड किल्ल्याचा धोकादायक कडा रात्री उतरुन जाणारी हिरकणी असो वा अन्य कुणीही. आपल्या हरवलेल्या लेकराला भेटण्यासाठी गेले सहा महिने अशाच कासावीस झालेल्या एका माऊलीची माया मंगळवारी (दि.७) फळाला आली. तिचं हरवलेलं लेकरु सापडलं. तब्बल सहा महिन्यांनी. शासनाच्या बाल कल्याण समितीने हे लेकरु तिच्या स्वाधीन करत या आईच्या ममतेला कुर्निसात केला.

दर्यापूर जि. अमरावती इथली. रेखा पवार तिचं नाव. पती विजय पवार आणि सोन्यासारखी तीन लेकरं. त्यातलाच एक दीड वर्षाचा सुमित. संसार गरिबीचा. आज इथं तर उद्या तिथं मोलमजुरी करुन गुजराण.

दि.१९ फेब्रुवारीची रात्र… हे थकलं भागलं कुटुंब कामासाठी दूरच्या गावी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपी गेलं. आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या ‘सुमित’ ला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अलगद उचलून नेलं. लेकरु जवळ नाही ही संवेदना तिला लगेच जाणवली. भांबावल्यासारखी उठली. सैरभैर आपल्या तान्हुल्याला शोधू लागली. तात्काळ पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या माऊलीस १६ मे पर्यंत वाट पाहावी लागली.

सुमित नागपूरला सापडला. तिथले बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक खान पठाण ह्या भल्या अधिकाऱ्यानं सुमितला मातृसेवा संघाच्या शिशुगृहात नेलं. तिथं त्याला ताब्यात घेऊन तिथल्या बालकल्याण समितीच्या ताब्यात दिलं. मग पुन्हा तपासाचा उलटा प्रवास. दि.२० मे ला अकोला रेल्वे पोलिसांत निरोप आला. लगेचच रेल्वे पोलिस निरीक्षक शेंडगे यांनी आई वडीलांचा संपर्क करुन तिला तिचं लेकरु सापडल्याची आणि ते सुखरुप असल्याची बातमी दिली.

विशेष म्हणजे या काळात करोनाच्या साथीमुळं लॉकडाऊन होतं. मिळेल त्या वाहनाने ही माऊली दर्यापूर हून अकोल्याला येत होती. अखेर सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर एका विशेष गाडीने सुमित मंगळवारी (दि.७ जुलै) नागपूरहून अकोल्याला आला. त्याच्या आई वडीलांना अकोल्याच्या बालकल्याण समितीने दर्यापूरहून बोलावलं होतं.

गाडीतून तिचं लेकरु अधिकाऱ्यांनी बाहेर आणलं… आणि गेले सहा महिने आपल्या लेकराच्या दर्शनाला आसुसलेली ही माऊली अक्षरशः हंबरडा फोडून रडू लागली. अखेर मायलेकराची भेट झाली. सहा महिन्यांपासून दुरावलेलं लेकरु आपल्या आईला जे घट्ट बिलगलं, ते कुणाकडे जाईच ना… हे सगळं बाल कल्याण समितीच्या विधी सेवा केंद्राच्या आवारात घडत होतं. एका माऊलीची ममता जिंकली होती. आणखी एक हिरकणी जिंकली होती…

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post