कोरोनाबाधितांना उपचार करणारे बूथ हॉस्पिटल झाले ‘हाऊसफुल्ल’


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नगरमध्ये आता कोरोनाचा वेगाने फैलाव होऊ लागला असल्याने चिंता वाढली आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या बुथ हॉस्पिटलमध्ये 100 बेडची क्षमता असून हे हॉस्पिटल हाऊसफुल झाल्याने बाधित रुग्णांवर उपचारासाठी आता जिल्हा शासकीय रुग्णालयात व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय पारनेर येथील केंद्रात 1 तर संगमनेर येथील केंद्रात 5 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. वेळप्रसंगी शहरातील खाजगी रुग्णालये अधिग्रहित केली जाणार आहेत. त्याची तयारी आरोग्य विभागाने सुरु केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात 24 मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आले होते. नगरमध्ये मात्र त्यापूर्वीच 19 मार्च पासून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले होते. 31 मे पर्यंत कडक लॉकडाऊन होते. त्यामुळे नगर शहरासह जिल्हयात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात होती. मात्र 1 जूनपासून अनलॉक -1 सुरु झाले आणि लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आली. शहरातील बाजारपेठ तसेच विविध उद्योग व्यवसाय सुरु झाले. शहरात गर्दी वाढली. बाहेरून पुणे, मुंबई सारख्या रेड झोन मधूनही मोठ्या प्रमाणात नागरिक शहरासह जिल्हयात आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला आहे.


नगर शहरात महिनाभरात वेगाने वाढला कोरोना संसर्ग
31 मे पर्यंत कडक लॉकडाऊन असताना नियंत्रणात असलेली कोरोना रुग्णांची संख्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर झपाट्याने वाढली. जिल्हयात महिना भराच्या कालावधीत तब्बल 353 बाधित रुग्ण आढळून आले. त्यात शहरात कोरोनाचा वेगाने फैलाव झाला आहे. एकट्या नगर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या गुरुवारी (दि.2) दुपारपर्यंत 186 वर पोहचली आहे. त्यातील 107 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. तर 78 रुग्ण कोरोना मुक्त होवून घरी परतले आहेत. शहरातील तोफखाना परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढत आहे. या भागात आत्तापर्यंत 52 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे या भागातील परिस्थिती गंभीर झाली आहे. शहरात तोफखाना, सिध्दार्थनगर, नालेगाव व आडतेबाजार असे चार कन्टेन्मेंट झोन आहेत. त्यात पद्मानगर येथे रुग्णांची संख्या वाढल्यामुळे हा भागही बुधवारी (दि.1) कन्टेन्मेंट झोन झाला आहे. 14 जुलैपर्यंत या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post