त्यांचे गर्दी करून उद्घाटन सुरू - खा. विखे




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - 'राम मंदिराचे भूमिपूजन हाती घेण्यात आले आहे. तो आपल्या देशाच्या आस्थेचा प्रश्न असून त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला सल्ला देण्यापेक्षा गर्दी जमवत दररोज वेगवेगळी भूमीपूजन, उदघाटने करणाऱ्या आपल्या पक्षाचे आमदार व मंत्र्यांवर नियंत्रण आणले पाहिजे,टोला खासदार डॉ.सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.

आज विखे हे जिल्हा परिषदमध्ये एका बैठकीच्या निमित्ताने आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राम मंदिर भूमिपूजनवरून भाजपवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला. 'महाविकास आघाडीचे कितीतरी मंत्री सध्या त्यांच्या मतदारसंघात रस्त्याचे भूमिपूजन करत आहेत. बंधाऱ्याचे जलपूजन घेऊ लागले आहेत, उद्घाटने करू लागले आहेत. आपल्या नगर जिल्ह्यात कर्जत-जामखेडचे आमदार हे रोज भूमिपूजन व उद्घाटन करून गर्दी गोळा करीत आहेत. करोना असल्यामुळे त्यांनी स्वतः हे थांबवले पाहिजे. हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र स्वतःच्या पक्षाचे आमदार, मंत्र्यांकडून होणारे भूमिपूजन, उद्घाटन रोखले जात नाही. आधी तुम्ही ही भूमिपूजने, उदघाटने थांबवा आणि मग भाजपला सल्ला द्या,' असे विखे म्हणाले.

'भाजपने जे भूमिपूजन हाती घेतले आहे, तो भारत देशाच्या आस्थेचा प्रश्न आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्ही गेली कित्येक वर्षे ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, ज्यामध्ये एक पिढी गेली, त्या रामजन्मभूमीचे निर्माण आता सुरू होत आहे. त्यामुळे त्यावर टीकाटिप्पणी करण्याची आवश्यकता नाही,' असे ते म्हणाले.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post