धक्‍कादायक! देशातील रुग्ण ५० हजारांनी वाढले



नवी दिल्ली - देशवासीयांच्या चिंतेत शुक्रवारी वाढलेल्या सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या संख्येने आणखी भर घालून धक्‍का दिला आहे. ही रुग्णसंख्या आपलाच उच्चांक मोडत वेगाने वाढत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येने गेल्या 24 तासांत 50 हजारांच्या घरात मजल मारली. सकाळी आठ वाजेपर्यंत बाधितांची संख्या 49,310 एवढी होती. रात्री  या संख्येने 50 हजारांचा टप्पा पार केला. दिवसभरात 740 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत दररोज वाढणार्‍या कोरोना रुग्णांएवढीच भारतातील रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत देशातील बाधितांची संख्या 1 लाखाने वाढली आहे. तर तीन हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे. कोरोना रुग्णसंख्येतील वाढ वैद्यकीय तज्ज्ञांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळपर्यंत उच्चांकी 49 हजार 310 कोरोना रुग्णांची भर पडली. तर 740 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे, देशात कोरोना विषाणूचा थैमान सुरू झाल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदा एकाच दिवशी 34 हजार 602 कोरोनामुक्‍त रुग्णांना विविध रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 12 लाख 87 हजार 945 एवढी झाली आहे. यातील 8 लाख 17 हजार 209 रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर 4 लाख 40 हजार 135 (34.17 टक्के) कोरोनाग्रस्तांवर  विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूने आतापर्यंत 30 हजार 601 (2.38 टक्के) रुग्णांचा बळी घेतला आहे. देशातील कोरोनामुक्‍तीचे प्रमाण 63.45 टक्के नोंदवण्यात आले आहे.

सर्वाधिक कोरोना प्रभावित महाराष्ट्रात एका दिवसात 9 हजार 895 कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आंध्र प्रदेश (7,998), तामिळनाडू (6,472), कर्नाटक (5,030), उत्तर प्रदेश (2,516), पश्‍चिम बंगालमध्ये (2,436) मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आलेत. या राज्यांच्या पाठोपाठ आसाम (2,019), बिहार (1,611), तेलंगणा (1,567), गुजरात (1,078), दिल्ली (1,041) तसेच केरळमध्ये (1,078) कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.



महाराष्ट्रात सर्वाधिक 298 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. कर्नाटकमध्ये 97, तामिळनाडू 88, आंध्र प्रदेश 61, पश्‍चिम बंगाल 34, गुजरात 28, उत्तर प्रदेश, दिल्लीत प्रत्येकी 26, राजस्थानमध्ये 11, मध्य प्रदेश 10, जम्मू-काश्मीर तसेच तेलंगणात प्रत्येकी 9 रुग्णांचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये 8 नागरिकांचा मृत्यू झाला. आसाम, ओडिशा तसेच हरियाणात प्रत्येकी 6 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. केरळमध्ये 5, उत्तराखंड, झारखंड, पुद्दुचेरी प्रत्येकी 3 आणि छत्तीसगड, त्रिपुरा तसेच गोवा येथे प्रत्येकी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला.

आतापर्यंत 1 कोटी 54 लाख 28 हजार लोकांच्या तपासण्या

भारतात आतापर्यंत 1 कोटी 54 लाख 28 हजार 170 नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील 3 लाख 52 हजार 801 नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या या गुरुवारी करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देण्यात आली आहे. देशात कोरोना संसर्गाची सुरुवात झाली तेव्हा 23 जानेवारीला केवळ एकच प्रयोगशाळा होती. 23 मार्चपर्यंत प्रयोशाळांची संख्या 160 एवढी झाली. सध्या देशातील 1 हजार 290 प्रयोगशाळांमध्ये कोरोनासंबंधीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. यातील 897 प्रयोगशाळा सरकारी, तर 393 प्रयोगशाळा खासगी आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post