हिवरे बाजार येथे होणार भारतीय संविधानाचे पारायण


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर–आदर्शगाव हिवरे बाजार येथे भारतीय संविधानाचे वाचन दररोज एक तास ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोरोनाच्या सर्व नियमांचे व अटींचे पालन करून करण्यात येणार आहे.संविधानाच्या पारायणातून ग्रामस्थांना नियमांची माहिती विस्तृतपणे होईल.

हिवरे बाजारामध्ये हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असून त्यात हनुमान, राम, लक्ष्मण, सीता, श्री.विठ्ठल, रुक्मिणी, श्री.संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा लॉकडाऊन संपल्यानंतर करण्यात येणार आहे. गेल्या ४ महिन्यापासून कोरोनाच्या नियमांचे अतिशय काटेकोर पालन हिवरे बाजार ग्रामस्थांनी केल्यामुळे आजपर्यत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. सध्या कोरोना आजाराने जगभर थैमान घातले असून टी.व्ही.वरील बातम्या बघून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव ग्रामीण भागात सुद्धा झपाट्याने सुरु झाला आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी हिवरे बाजार येथे या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात प्रत्येकाने स्वतःच्या घरात सकाळ, दुपार, संध्याकाळ आपापल्या धार्मिक ग्रंथाचे विशेषतः साईचरित्र, हनुमान चालीसा, रामरक्षा, ज्ञानेश्वरी गाथा, गुरुचरित्र, ग्रामगीता, बौध्दतत्त्वज्ञान, कुराण, बायबल, नवनाथगाथा यांचे पारायण करावे. यातून मनोबल वाढण्याचा प्रयत्न होणार असून ताणतणाव दूर होऊन आनंद मिळेल व कुटुंबातील स्नेहभाव वाढेल व निष्कारण बाहेर फिरणेसुद्धा कमी होईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post