सलूनला परवानगी ; दाढी, ब्युटी पार्लर आणि स्पा वेटिंगवर
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले सलून व्यवसाय अखेर येत्या २८ जूनपासून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मुंबईसह राज्यभरात सलून सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचे मार्गदर्शक तत्वे आखून देण्यात आली आहेत.
सलूनमध्ये फक्त केस कापण्यास परवानगी राहील, दाढी करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच ब्युटी पार्लर आणि स्पा सुरू करण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. सलूनसाठी नियमावली तयार करण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन, मास्कचा वापर, सॅनिटाइझेशन बंधनकारक असेल, असे सांगण्यात आले.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, सलूनमध्ये केस कापण्यासाठी जाणाऱ्याने मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्याचवेळी जो केस कापणारा आहे, त्यानेही मास्क वापरायचा आहे. सोशल डिस्टन्सिंगचे अन्य सर्व नियम पाळणेही सक्तीचे असणार आहे. पुढचे काही दिवस याचे बारीक निरीक्षण केले जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
Post a Comment