उपनगरातील सर्वच रस्ते झालेत खड्डेमय



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरातील बहुतांशी रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, महापालिकेने केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांची लागलेली वाट आणि त्यातच रात्रीच्या वेळी बंद असलेले पथदिवे यामुळे नगरकरांना जीव मुठीत धरुनच वाहने चालविण्याची वेळ आली आहे. 15 दिवसांत 3-4 वेळा झालेल्या थोड्याशा पावसानेच महापालिकेच्या कामाचा दर्जा उघडा पाडला आहे.

शहरातील माळीवाडा, वाडिया पार्क, टिळक रस्ता, जुनी महापालिका ते शनि चौक रस्ता, माणिक चौक, तोफखाना परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्ते यांसह शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झालेले आहेत. खड्डा नाही, असा रस्ता शोधूनही सापडणार नाही. या परिसरात असणारे रस्ते हे येथे असणार्‍या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आता ओळखले जातील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सावेडी व केडगाव उपनगरांतील रस्त्यांचीही स्थिती फारशी वेगळी नाही. येथेही अंतर्गत रस्ते खड्डेयुक्तच आहेत. विशेष म्हणजे वर्षातील बारा महिने रस्त्यांवरील हे खड्डे कायम असतात. याबाबत एखाद्या संघटनेने आंदोलन केले अथवा मनपाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले, तर मनपाकडून पॅचिंग करून खड्डे बुजवण्यात येतात. पण अवघ्या काही दिवसात असे पॅचिंग निघून गेल्याचा अनुभव आहे. त्यामुळे शहरातील खड्ड्यांची समस्या कायमस्वरुपी सुटेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या शहरात दररोज वाहनचालकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे. या खड्डे चुकविण्याच्या नादात खड्ड्यांमध्ये वाहने आदळून अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये नागरिकांना दुखापती होण्याबरोबरच वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचत असल्याने या खड्ड्यांचा अंदाजही नागरिकांना येत नाही.

रखडलेली फेज 2, चांगल्या रस्त्यांच्या मुळावर

शहरातील अनेक भागात महापालिकेकडून फेज – 2 च्या कामासाठी रस्त्याची खोदाई सुरु आहे. त्यामुळे चांगल्या स्थितीत असलेले काही रस्तेही या खोदाई मुळे पुन्हा खड्डेमय होत आहेत. फेज 2 चे कामही आवश्यक आहेच. परंतु ते गेल्या 8-10 वर्षापासून रखडत रखडत सुरु असून ज्या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे ते करण्यापूर्वी त्या भागातील फेज 2 चे काम प्राधान्याने करण्यात यावे अशा स्पष्ट सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. तरीही बांधकाम विभाग आणि पाणीपुरवठा विभाग यांच्यात समन्वय नसल्याने अगोदर रस्त्याचे काम होते व नंतर फेज 2 च्या कामासाठी पुन्हा रस्ता खोदला जात आहे. शहरातील बहुतांश रस्ते अगोदरच खड्ड्यात गेलेले असताना त्यात अजून भर टाकली जात आहे. महापालिकेच्या या नियोजन शून्य कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून नागरिकांनी कर रूपाने भरलेल्या पैशाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय सुरु आहे.

महापालिका पथदिवे तरी दुरुस्त करणार का?

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरातील सर्वच रस्त्यांची वाट लागलेली असताना शहरासह उपनगरातील बहुतांशी पथदिवेही नादुरुस्त होवून बंद पडलेले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरून रात्रीच्या अंधारात प्रवास करणे मोठे दिव्य ठरत आहे. त्यातच पाऊस झाल्यावर पाणी साचल्यामुळे तर रस्त्यावरील खड्ड्यांचा कुठलाच अंदाज नागरिकांना येत नाही.

त्यामुळे खड्डे बुजविता येत नसतील तर किमान शहरातील पथदिवे दुरुस्त करुन ते चालू तरी करावेत अशी नागरिकांची मागणी आहे. पथदिवे बंद असल्याने अंधाराच्या साम्राज्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महापालिकेने तातडीने पथदिवे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अनेक ठिकाणी महापालिकेने रस्त्यांची खोदाई केलली आहे. ते काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post