नगरमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर शहरासह उपनगरातील विविध रस्त्यावर भाजीपाल्यासह गृहपयोगी वस्तूंचा बाजार भरू लागला आहे. शेकडो नागरिक रस्त्यावर आल्याचे चित्र सध्या शहरात सगळीकडेच दिसू लागले आहे.

देशासह जगभरात सध्या कोरोना महामारीचे संकट सुरु आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे शाळा कॉलेजांसह सर्व उद्योग, धंदे, दुकाने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने, रिक्षा, विविध कार्यालये बंद होती. रस्त्यावर संचारबंदी लागू केलेली होती. या कालावधीत अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाची जगण्यासाठीची धडपड सध्या सुरु आहे.


आता 1 जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असल्याने अनेकांनी आपली व कुटुंबाची उपजीविका चालविण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केलेली आहे. ज्यांचे रोजगार गेले आहेत, त्यांनी नवीन रोजगार पाहण्यास सुरुवात केली आहे तर अनेकजण छोटे मोठे व्यवसाय करू लागले आहेत. त्यामुळेच शहरासह उपनगरातील सर्वच रस्त्यांवर विविध प्रकारचे बाजार भरू लागले आहेत. कोणी फळ विक्री करतंय, तर कोणी भाजीपाला, खाद्यपदार्थ तर काहीजण तोंडाला बांधण्यासाठी मास्क विकत आहे. काही गृहउपयोगी वस्तूंचे स्टॉल लागल्याचेही ठिकठिकाणी दिसून येत आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता कोरोनाचा कहर अद्याप संपलेला नाही. दररोज कोरोनाचे बाधित रुग्ण आढळतच आहेत. त्यामुळे ही परिस्थिती अजून किती काळ राहील, हे आज तरी कोणीही सांगू शकणार नाही. त्यामुळे रोजगार अजून किती काळ मिळणार नाही, हे ही काही निश्चित सांगता येत नसल्यामुळे मिळेल त्या मार्गाने पैसे मिळवत आपली व कुटुंबाची उपजीविका चालविण्यासाठी शेकडो नागरिक रस्त्यावर आल्याचे चित्र सध्या शहरात सगळीकडेच दिसू लागले आहे.

माणसाचं जगणं किती मुश्किल झालं याची ही वास्तविकता

शहरातील कायनेटिक चौक, माळीवाडा ते वाडिया पार्क रस्ता, बसस्थानक ते माळीवाडा, आयुर्वेद कॉलेज कोपरा ते थेट अमरधामपर्यंतचा रस्ता, दिल्लीगेट, जुनी वसंत टॉकीज ते बंगाल चौकी रस्ता, चितळे रोड, गांधी मैदान स्टेट बँक चौक परिसर, सावेडी गाव, पाईपलाईन रस्ता, एकविरा चौक, श्रीराम चौक यासह उपनगरातील रस्त्यांवरही असे बाजार ठिकठिकाणी दिसून येत आहेत. कोरोना महामारीमुळे माणसाचं जगणं किती मुश्किल झालं आहे, याची वास्तविकता दाखविणारे हे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post