दाट वस्तीत करोना; 'यांनी' स्वीकारले आव्हान
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर मध्ये सिद्धार्थनगर, नालेगाव, तोफखाना अशा दाट वस्तीमध्येच करोना विषाणू संसर्गाचा शिरकाव झाल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे खुद्द जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रस्त्यावर उतरले आहेत. द्विवेदी यांनी आज सायंकाळी नालेगाव भागात जाऊन करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. तसेच हॉटस्पॉटमधून कोणीही बाहेर जाणार नाही, व बाहेरून हॉटस्पॉटमध्ये कोणी येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसात ४४ करोना बाधित रुग्ण सापडले असून आतापर्यंत जिल्ह्यात सापडलेल्या करोना बाधितांचा आकडा हा ३४९ झाला आहे.
नगर शहरामध्ये काल १८ आणि आज १२ असे तब्बल ३० करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांमध्ये नालेगाव, सिद्धार्थनगर व तोफखाना या दाटवस्तीमधील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी तातडीने नालेगाव, सिद्धार्थनगर व तोफखाना हे तीन परिसर हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले आहेत. या परिसराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. येथील अत्यावश्यक सेवेची दुकानेही बंद करण्यात आली असून या सेवा महापालिकेकडून देण्यात येणार आहेत. मात्र, हा परिसर दाटवस्तीचा असल्यामुळे येथे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे अहमदनगर महापालिका व जिल्हा प्रशासनही विशेष खबरदारी घेत आहे.
आज सायंकाळी तर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नालेगाव येथे जाऊन पाहणी केली. यावेळी पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन यांच्यासह विविध यंत्रणांना करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी काटेकोरपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आदी उपस्थित होते.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात करोना रुग्ण आढळण्याचा वेग वाढला आहे. जिल्ह्यामध्ये दोनच दिवसांमध्ये ४४ करोना बाधित सापडले असून त्यापैकी ३० जण नगर शहरातील आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना आरोग्य विभागाकडून ताब्यात घेण्यात येत आहे. तसेच अनलॉक सुरू झाल्यापासून ज्या भागात जास्त गर्दी होत आहे, तेथील गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. नगर शहरातील महत्त्वाचा असणारा चितळे रोड सुद्धा पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. नगर शहराच्या अंतर्गत भागात हॉटस्पॉट जाहीर करण्यात आल्याने नगरची ऐतिहासिक दिल्लीगेट वेस सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post