कंन्टेन्मेंट झोनमध्ये जबरदस्तीने प्रवेश करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - मोटारसायकलवर डबलसीट फिरण्यास मनाई असताना तोंडाला मास्क न लावता कंटेन्मेंट झोनमध्ये लावलेले पत्रे उचकटून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या दुचाकीस्वारास कोतवाली पोलिसांनी पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.9) सायंकाळी घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी पोलिस उपनिरीक्षक कणसे, पोलिस नाईक टकले, पोलिस नाईक सागर पालवे यांना केबिनमध्ये बोलावून सांगितले की, जिल्हाधिकारी आदेश क्रमांक बी.सी./कार्यालय 9 ब/1/909/2020 नगर यांनी 31 मे रोजी आदेश जाहीर केल्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जिल्ह्यात अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी 1 जून ते 30 जून दरम्यान फिरण्यास मनाई केली. तसेच मोटारसायकलवरुन डबलसीट फिरता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कारवाई करा असे सांगितले. यावरुन पोलिस उपनिरीक्षक कणसे पोलिस पथकासह नाकाबंदी करीत असताना माळीवाडा परिसरात कंन्टेन्मेंट झोन असलेल्या रस्त्यावरुन भाऊसाहेब अर्जुन ईश्‍वर (वय 36, रा.राजापूर, श्रीगोंदा) हा त्याच्या मोटारसायकल (क्र.एम.एच.16, ए.पी.9076) वरुन मास्क न लावता शासनाने लावलेले पत्रे उचकटताना आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलिस नाईक सागर पालवेच्या फिर्यादीवरुन भारतीय दंड विधान कलम 188, 269, 427, साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (ब) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील कारवाई पोलिस नाईक खोमणे हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post