नायब तहसीलदाराकडे गडगंज संपत्ती ; गुन्हा दाखल


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरात रहिवासी असलेले व सध्या नाशिक जिल्ह्यात सुरगणा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या राजाराम बाळासाहेब गायकवाड व त्याची पत्नी सुशीला राजाराम गायकवाड (दोघे रा. रेणुकानगर, केडगाव) यांनी उत्पन्न स्त्रोतापेक्षा जास्त मालमत्ता (अपसंपदा) संपादन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन 1988 (संशोधन), सन 2018 चे कलम 13 (1),(ब) 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांनी गायकवाड यांच्या विरोधात नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपत्तीची उघड चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गायकवाड यांच्या संपत्तीची उघड चौकशी केली गेली. सन 1983 ते 2014 या परीक्षण कालावधीत त्यांना त्यांच्या ज्ञात स्त्रोतामधून मिळालेले कायदेशीर उत्पन्न, एकूण खर्च व त्या कालावधीत त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तौलनिक अभ्यास केला.

गायकवाड यांनी सन 1991 ते 2004 पर्यंत जास्त मालमत्ता संपादित केली असल्याचे मालमत्तेच्या उघड चौकशीमध्ये निष्पन्न झाले. तसेच, सदर मालमत्ता संपादित करण्याकरिता राजाराम गायकवाड यांना त्यांची पत्नी सुशीला गायकवाड हिने प्रोत्साहन दिले म्हणून दोन्ही आरोपींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे, पोलीस हवालदार तनवीर शेख, हरुण शेख, अशोक रक्ताटे, पोलीस नाईक प्रशांत जाधव, विजय गंगुल, पोलीस शिपाई रवींद्र निमसे, वैभव पांढरे, महिला पोलीस शिपाई राधा खेमनर, संध्या म्हस्के यांच्या पथकाने केली.

नगर, पारनेरात सेवा
राजाराम गायकवाड 1983 मध्ये तलाठी म्हणून नगर जिल्ह्यात रुजू झाले. त्यांनी पारनेर तालुक्यात हंगा, सुपा, वनकुटे, निघोज, नगर तालुक्यातील जेऊर, सावेडी येथे तलाठी, मंडल अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकून म्हणून नोकरी केली. सध्या ते पदोन्नतीवर नाशिक जिल्ह्यात सुरगणा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.

अशी आहे संपत्ती
परीक्षण कालावधीत राजाराम गायकवाड यांनी केडगाव येथे चार प्लॉट, त्यातील दोन प्लॉटवर दोन मजली बांधकाम, रुई छत्तीशी, सुपा, हंगा, चास, बाबुर्डी, नेप्ती इत्यादी ठिकाणी शेत जमीन, प्लॉट, गाळे खरेदी केले आहेत. तसेच सावेडी येथील माऊली संकुलमध्ये गाळा खरेदी केला आहे. सुपा येथे देशी-विदेशी दारूचे दुकान, पत्नी व मुलाच्या नावे हॉटेल सुरू केले आहे. तसेच, स्वतःच्या नावे, मुलाच्या व पत्नीच्या नावे दोन महिंद्रा एचपी ट्रॅक्टर, दोन चारचाकी, तीन दुचाकी अशी वेगवेगळी वाहने खरेदी केली आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post