ग्रामपंचायतीचे प्रशासकपद सरपंचांच्या घरातच !
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याची वेळ फार आनंदाची नाही. सध्याची परिस्थिती पाहता गावात करोनाविरूद्धच्या लढाईत सरपंच आणि त्यांचे सहकारी आहेत. मात्र पर्याय नसल्याने प्रशासक नियुक्त केला जाणार आहे. हे करताना प्रत्येक ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकार्याला नियुक्त करणेही शक्य होणार नाही. त्यामुळे जेथे महिला सरपंच असेल, तेथे त्यांचे पती किंवा जेथे पुरूष सरपंच असेल, तेथे त्यांची पत्नी प्रशासक म्हणून नियुक्त करता येईल का, याचाही विचार सुरू असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकच नेमावा लागेल. यापूर्वी काहींना मुदतवाढ दिली होती, ती न्यायालयात टिकली नाही. त्यामुळे प्रशासक नेमल्याशिवाय पर्याय नाही. केंद्र सरकारनेच तसा कायदा केलेला आहे. ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला असून, त्यावर राज्यपालांची सही होणे शिल्लक आहे. त्यांची सही झाल्यानंतर प्रशासक नियुक्तीची कार्यवाही हाती घेतली जाईल, असेही ना. मुश्रीफ म्हणाले.
जेथे महिला सरपंच असेल, तेथे त्यांचे पती किंवा जेथे पुरूष सरपंच असेल, तेथे त्यांची पत्नी प्रशासक म्हणून नियुक्त करता येईल का, याचाही विचार सुरू असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. तसे झाल्यास सरपंचांच्या घरातच प्रशासकपद येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात करोनाच्या उपाययोजनांबाबत ना. मुश्रीफ यांनी बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान, मृत्यूची संख्या घटली तरी त्यांना वाईट वाटते अन् रुग्णांची संख्या कमी झाली तरीही त्यांना वाईट वाटते. विरोधकांनी आता मौन ठेवणे गरजेचे आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी टीका केली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकार करोनाला आळा घालण्यात पूर्णतः अपयशी झाल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना ना. मुश्रीफ म्हणाले, एकीकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करोनाला आळा घालण्यात यश आल्याचे म्हणतात, दुसरीकडे राज्यातील नेते वेगळेच बोलतात. त्यामुळे नक्की कोण खरे आणि खोटे बोलते, ते त्यांनी ठरवावे. हे सरकार कधी पडेल, यासाठी विरोधक देव पाण्यात घालून बसले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझा राजकीय अनुभव चांगला आहे. त्यांचे नशीब म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्याने ते मोठे झाले. मात्र त्यांनी आता गप्प बसणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना ‘मौनम सर्व साधनम’ आणि ‘अध्यात्म’ याची पुस्तके मी वाचायला दिली. मात्र त्यांनी ती वाचलेली दिसत नाहीत. राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील सरकार म्हणजे सर्कस असल्याचे म्हटल्याकडे लक्ष वेधले असता, आमच्याकडे कोणी जोकर नाही, अशी टीप्पणी त्यांनी केली.
Post a Comment