शेतकर्‍यांच्या प्रश्नाला केराची टोपली; पीककर्ज देण्यास बँकांचा नकार


माय अहमदनगर वेब टीम
राहुरी - खरिपासाठी हवामान पोषक असूनही केवळ आर्थिक संकटामुळे राहुरी तालुक्यातील खरीप रखडला आहे. जिल्हा बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकाही नवीन पीककर्ज देत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. तर चौथ्या यादीतही कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढत असताना शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकर्‍यांनी त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बँकांचे अडवणुकीचे धोरण आणि ना. तनपुरे यांची उदासिनता यामुळे राहुरी तालुक्यातील खरीप गोत्यात येण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, तनपुरे यांनी मंत्रिपदाचा पद्भार सांभाळल्यापासून त्यांचे मतदारसंघातील शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकर्‍यांच्या पाठिंब्याने निवडून येणार्‍या ना. तनपुरे यांना आता मतदारसंघातील शेतकर्‍यांचा विसर पडला असल्याची टीका होत आहे. खरीप हंगामाच्या पेरण्या व लागवडी सुरू आहेत. तर काही शेतकरी मशागतीत मग्न आहेत.

मात्र, खरिपाच्या तयारीसाठी शेतकर्‍यांना बियाणे, खते व मशागतीच्या खर्चासाठी आर्थिक टंचाई आहे. राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांना जिल्हा बँक आणि राष्ट्रीयीकृत बँका नवीन पीककर्ज देण्यास तयार नाही. राज्य शासनाचा नवीन पीककर्ज देण्याचा अध्यादेश आहे. मात्र, हा आदेशच आला नसल्याचे सांगून बँकांनी शेतकर्‍यांना टोलवाटोलवी चालविली आहे. त्याकडे ना. तनपुरे यांनी सपशेल दुर्लक्ष केले आहे. मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे पाठ फिरवून राज्यात फेरफटका मारून तेथील हालहवाल पाहण्यात ते मग्न झाले आहेत. त्यामुळे आपली व्यथा आता सांगावी कुणाला? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

राहुरी विद्यापीठात दोन दिवसांपूर्वी कांदा बियाण्यांची विक्री करण्यात आली. यात राहुरीतील अनेक शेतकर्‍यांना पैसे भरूनही बियाणे मिळाले नाही. यावर ना. तनपुरे यांनी हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर मौन बाळगले आहे. मुळा धरणातील आवर्तनाच्या बाबतीतही शेतकर्‍यांची मोठी हेळसांड झाली. त्यावर ना. तनपुरे यांनी चकार शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर कळवळा आणणारे ना. तनपुरे यांची भूमिका कशी बदलली? याबाबत शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post