नगरकरांना गुड न्युज ; जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी लॅब कार्यान्वित - १५ स्त्रावांची झाली चाचणी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली असून आज १५ व्यक्तीचे घशातील स्त्रावांची तपासणी करण्यात आली. त्यातील १० अहवाल निगेटीव आले असून एका अहवालाचा निष्कर्ष निघाला नसून उर्वरित ०४ व्यक्तींचे अहवाल पुन्हा तपासले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. दरम्यान, आज बूथ हॉस्पिटलमधून ०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे एकूण ७२ वाधित रुग्णांपैकी आता ५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १६ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त झालेले तीन पैकी ०२ जण नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील तर ०१ जण वंजारगल्ली येथील आहे. या ठिकाणी कन्टेन्मेंट झोन असल्याने या रुग्णांना बूथ हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे.

येथील कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळेस कालच आयसीएमआरकडून मान्यता मिळाली. काल रात्री आवश्यक लॉगिन आयडी प्राप्त झाल्यानंतर येथील कामकाजास सुरुवात झाली. त्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात १५ व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज दुपारी त्याचा अहवाल प्राप्त झाला. येथील मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही झाल्याची माहिती डॉ. मुरंबीकर यांनी दिली.

दरम्यान, आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या वतीने १९८६ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी १८५१ व्यक्तींचे स्त्राव निगेटीव आले असून ७२ व्यक्तींचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यापैकी ०६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post