'या' कारणाने मित्रानेच मित्राचा आवळला गळा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कल्याण रस्त्यावरील नेप्ती शिवारातील पुलाखाली काही दिवसांपूर्वी आढळलेल्या मृतदेह प्रकरणाचा नगर तालुका पोलिसांकडून उलगडा करण्यात आला. किरकोळ कारणातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. मच्छिंद्र बाबुराव म्हस्के (वय 48, रा. बुरूडगाव रोड) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकरसिंह राजपूत उपस्थित होते.

नगर-कल्याण महामार्गावर नेप्ती शिवारात पुलाखाली दि.18 एप्रिल रोजी अनोळखी मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा नगर तालुका पोलिसांकडून तात्काळ तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील आणि इतर ठिकाणची माहिती घेतली. पोलिस तपासात नंदा रघुनाथ बर्डे (वय 35, रा. नालेगाव) हिचा पती घरातून निघून गेल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. नंदा हिस मृतदेह दाखविण्यात आल्यानंतर सदर मृतदेह तिचा पती रघुनाथ एकनाथ बर्डे यांचा असल्याची साशंकता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर आलेल्या शवविच्छेदन अहवालात गळा दाबून मृत्यू झाल्याचा अभिप्राय नमूद करण्यात आला. त्यानुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेहाची डीएनए तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह रघुनाथ एकनाथ बर्डे (रा. नालेगाव) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकरसिंह राजपूत यांनी आरोपीच्या शोधार्थ वेगवेगळी पथके रवाना केली. मच्छिंद्र बाबुराव म्हस्के (वय 48, रा. बुरूडगाव रोड) हा मयत रघुनाथ बर्डे यांच्याबरोबर नेप्ती शिवारात दिसल्याची माहिती सपोनि राजपूत यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, कल्याण रस्त्यावरील पुलाखाली बर्डे यांना गळा दाबून मारल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी आरोपी म्हस्के यास अटक केली. उपनिरीक्षक रितेश राऊत, धनराज जारवाल, पोहेकॉ बापुसाहेब फोलाने, पोना रावसाहेब खेडकर, अशोक मरकड, राहुल शिंदे, बाळू कदम, प्रमीला गायकवाड, पोकॉ ज्ञानेश्‍वर खिळे, धर्मराज दहिफळे आदींच्या पथकाने तपासकामी कार्यवाही केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post