राजभवनात खर्च कपातीच्या धोरणातून 10 ते 15 टक्के वार्षिक बचत होणार असल्याचा दावा




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनासाठी ऑस्टेरिटी प्लॅन अर्थात खर्च कपातीचे धोरण गुरुवारी जाहीर केले आहे. यामध्ये प्रस्तावित नवीन कार किंवा वाहन खरेदी करण्याचे निर्णय लांबणीवर टाकण्यात आले आहेत. सोबतच, यापुढे चालू वित्तीय वर्षात कुठल्याही व्हीआयपीच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छांची खरेदी केली जाणार नाही असे राजभवनातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये राजभवानाच्या खर्चातून जवळपास 10 ते 15 टक्क्यांची बचत होईल असा दावा केला जात आहे.
राज्यपालांनी राजभवनात कुठल्याही प्रकारचे बांधकाम, नुतनीकरण आणि डागडुजीसह नव्याने खर्च करावे लागेल असे सर्व काम थांबवण्याचे आदेश जारी केले. चालू वित्तीय वर्षात कुठलेही मोठे काम होणार नाही. केवळ जी छोटी दुरुस्तीची कामे सुरू आहेत त्यांनाच परवानगी दिली जाईल.
पुढील आदेशापर्यंत राजभवान कुठल्याही प्रकारची भरती केली जाणार नाही. राजभवनासाठी नवीन कार आणि इतर वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव देखील पुढे ढकलण्यात आला आहे. कुठल्याही पाहुण्याचे व्हीआयपी स्वागत होणार नाही. त्यांना पुष्पगुच्छ दिले जाणार नाहीत. व्हीआयपींच्या स्वागतासाठी राजभवनातील गेस्ट रुम सजवले जाणार नाहीत. विद्यापीठांच्या कुलगुरू आणि इतर महत्वाच्या व्यक्तींसोबत होणाऱ्या बैठकांना सुद्धा राज्यपाल व्हिडिओ काँफ्रंसिंगच्या माध्यमातून उपस्थिती लावणार आहेत. जेणेकरून वाहन आणि प्रवासाचा खर्च देखील वाचवता येईल.
पीएम केअर्समध्ये केले वेतन दान
कोरोनामुळे देश आणि राज्यात मोठे नुकसान झाले आहे. उद्योगधंदे बंद असल्याने जीएसटी सुद्धा गोळा होत नाही. कोश्यारी यांनी आधीच आपल्या एका महिन्याचे वेतन आणि वर्षभरासाठी वेतनातील 30 टक्के रक्कम पीएम केअर्स फंडमध्ये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढता सरकारी खर्च कमी करणे हा यामागचा मूळ हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post