विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांवर आता कठोर कारवाई


वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाला जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांचे आदेश

माय अहमदनगर वेब तीम
अहमदनगर - कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या राज्य व केंद्र सरकारने दिनांक १४ एप्रिलपर्यत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. खाजगी वाहतूक आणि खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. असे असतानाही नगर शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात विनाकारण दुचाकी अथवा चारचाकी घेऊन अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत, अशा नागरिकांना आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी चांगलाच दणका दिला. स्वत: रस्त्यावर उतरुन त्यांनी अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. कोरोनाचा प्रभाव वाढत असताना जिल्हावासियांनी अत्यंत काळजी घेणे गरजेचे असताना अतिउत्साही नागरिक प्रतिबंधात्मक कायद्याचा भंग करुन इतर नागरिकांची सुरक्षितता आणि आरोग्य धोक्यात घालण्याचे काम करीत आहेत. यापुढे विनाकारण असे नागरिक रस्त्यावर दिसले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यापूवी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्रे, विविध आस्थापना, सर्व प्रकारची दारु विक्री दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलपर्यंत असल्याने या आणि यापूर्वी जारी करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधात्मक आदेशांची मुदत १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही विनाकारण नागरिक दुचाकी किंवा चारचाकी घेऊन रस्त्यावर येतानाचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे. वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाने यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश श्री. द्विवेदी यांनी यावेळी दिले.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत करीत असताना आणि ९० टक्क्यांहून अधिक नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत असताना केवळ १० टक्के व्यक्ती अशा विनाकारण स्वताचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांचा मूळ उद्देश मागे पडण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वताहून आता अनावश्यक रित्या बाहेर पडणे टाळावे. जीवनावश्यक वस्तू, किराणा माल घेण्यासाठी दुचाकी किंवा चारचाकी वापरण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपल्या घराजवळच्या दुकानातून पायी चालत जावून या वस्तूंची खरेदी करावी. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही तसेच सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाईल, हे पाहा. यापुढे प्रतिबंधात्मक आदेशाची पायमल्ली करणार्‍यांची गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला तसेच दूध आदी वाहतूकीसाठी अत्यावश्यक सेवेअंतर्गत पासेस देण्यात आले आहेत. अशा पासेसचा दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या व्यक्तींविरुद्धही कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनावर मात करण्यासाठी संपर्क टाळणे अति महत्वाचे आहे. मात्र, या गोष्टीचे व्यवस्थित पालन होणे गरजेचे आहे. नागरिकांनी आता परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे आणि नियमांची अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

शहरातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्यासह शहरातील विवध भागांना भेटी दिल्या. मुकुंदनगर, कोटला स्टॅन्ड, सर्जेपुरा, बागडपुरा, दिल्लीगेट, नेप्तीनाका चौक, आयुर्वेद कॉर्नर, मार्केटयार्ड चौक, माळीवाडा आदी भागात जाऊन विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांना रोखले आणि त्यांच्यावर कारवाईचे निर्देश दिले.

सर्व शासकीय सेवांशी निगडीत वाहने, रुग्‍णवाहिका, अग्निशमन वाहने, वैद्यकीय उपचारासाठी लागणारे वाहने (पुराव्‍यासह), सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम, आजारी व्‍यक्‍ती तसेच रुग्‍णालय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाने, प्रसारमाध्‍यमांचे कर्मचारी व प्रतिनिधी यांची वाहने, दुरध्‍वनी व इंटरनेट सेवा पुरविणा-या आस्‍थापनांकडील वाहने भाजीपाला विक्री करणारे फेरीवाले, एस टी महामंडळ व अहमदनगर महानगरपालिका यांचेकडील बसेस व अहमदनगर जिल्‍हयातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व अहमदनगर कॅन्‍टोन्‍मेट बोर्ड हद्दीतून जाणारे राज्‍य महामार्ग व राष्‍ट्रीय महामार्गावरील मालवाहतूकीची वाहने ( मात्र मालवाहतूक करणा-या वाहनातील प्रवासी वाहतूक पतिबंधित राहील) तसेच आस्‍थापनावरील अधिकारी व कर्मचारी यांच्‍या वाहनांचा (मात्र ओळखपत्र आणि संबंधीत पुराव्‍यांसह) यांनाचा केवळ यात सूट देण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post