‘आरईटी’प्रवेशासाठी 5 हजार 655 अर्ज


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांतील 25 टक्के प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे. प्रवेश अर्ज भरण्यात येत आहेत. नगर जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 655 अर्ज मिळाले आहेत. प्रवेश अर्ज भरण्यासाठी आज 29 फेब्रुवारी अंतिम मुदत आहे. या प्रवेश प्रक्रियेस शिक्षण विभागाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांत त्यांच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या जागांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्यात कार्यवाही सुरू आहे. पहिल्या टप्प्यात शाळांनी नोंदणी केली आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील 393 शाळा पात्र ठरल्या आहेत.

त्यानंतर आता ऑनलाइन अर्ज भरण्यात येत आहेत. अर्ज भरण्यासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 655 अर्ज मिळाले आहेत. अर्ज करण्यास मुदत आहे. यानंतर अर्जांतून सोडत काढण्यात येणार आहे. या पद्धतीने शाळांतील प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. यंदा शिक्षण विभागाने या प्रक्रियेत बदल केला आहे. यंदा एकच सोडत काढण्यात येणार आहे.

त्यामुळे या प्रक्रियेतील वेळ कमी होणार आहे. याआधी तीन ते चार वेळा सोडत काढण्यात येत होती. तरीदेखील जागा रिक्त राहात होत्या. या वेळी मात्र असे होणार नाही. एकच सोडत काढण्यात येणार असून, जितक्या रिक्त जागा असतील, त्या संख्येइतकीच प्रतीक्षा यादी राहणार आहे, असे सांगण्यात आले. दरम्यान, नगर जिल्ह्यात पालक अर्ज करीत आहेत. अर्ज वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेस आणखी मुदतवाढ देण्याची मागणी पालकांतून होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post