ठोस पुराव्यानंतरच इंदोरीकर महाराजांवर कारवाई होणार


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -  इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही, ज्या माध्यमांनी महाराजांनी केलेल्या वक्तव्याची बातमी छापली होती. त्यांना नोटीस देण्यात आली असून त्यांनी पुरावा दिल्यास त्या पुराव्याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया आरोग्य समितीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली आहे,

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी आपल्या किर्तनामध्ये महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच मूल जन्माबाबतही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व भूमता बिग्रेडने पीसीपीएनडीटी कायद्यान्वये इंदोरीकर महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.

महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर अहमदनगर जिल्हा आरोग्य समितीकडून इंदोरीकर महाराजांना त्यांनी केलेल्या वक्तव्याचा खुलासा 7 दिवसांत सादर करण्याची नोटीस बजावली होती. त्या नोटिशीला उत्तर देत मी असे कोणतेही वक्तव्य केले नसून जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी अहमदनगर जिल्ह्यांमध्ये एकही कीर्तन केले नसल्याचा खुलासा इंदोरीकर महाराजांनी सादर केला आहे.

दरम्यान, इंदोरीकर महाराजांबरोबर ज्या माध्यमांनी ही बातमी छापली होती, त्यांना देखील आम्ही नोटिशी बजावल्या आहेत. जर त्या माध्यमांनी आम्हाला त्या वक्तव्याचे पुरावे आणून दिले तर आम्ही त्या पुराव्यांची शहानिशा करून महाराजांवर योग्य ती कारवाई करू, असे सांगण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post