शाळकरी मुलांचा आहार कसा असावा...माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - मुलांनी पोटभर जेवण करावे, असे प्रत्येक आईला वाटत असते. शाळकरी मुलांची तर जास्तच काळजी वाटत असते. या वयात मुलांची वाढ झपाटय़ाने होते. त्यामुळे त्यांना अन्नाची जास्त गरज असते. या कारणामुळे या वयात सर्व अन्नघटकांना फार महत्त्व असते. मुलांचा संतुलित आहार कसा असावा हे जाणून घेऊया...

दुधाचे पदार्थ द्या : काही मुलांना पालक आणि दूध आवडत नाही. मुलांनी दूध घ्यावे असे आपल्याला वाटत असते. दुधामध्ये चांगल्या प्रतीची प्रथिने असतात व कॅल्शिअम असते. त्यामुळे दूध पौष्टिक आहाराचा घटक आहे. दूध घेत नसेल तर त्याच दुधाचे दही लावून दही देऊ शकता. बऱ्याच मुलांना पनीर खूप आवडते. त्यांना दुधाऐवजी पनीरसुद्धा देता येते. दूध पिणेच गरजेचे नाही तर त्यांच्या आवडीप्रमाणे पदार्थ म्हणजे कस्टर्ड, मिल्कशेक इत्यादी करून किंवा लस्सी, फ्रूट-योगर्ट किंवा पनीरचे पदार्थ केले तरीही चालते.

पराठे, थालीपीठ बनवावे : दूधाबरोबरच मुलांना डाळी, कडधान्ये, तेलबिया व मांसाहार द्यायला हवा. यात भररूप प्रथिने असतात. मुलांच्या प्रत्येक मील-स्नॅकमध्ये प्रथिने असणे आवश्यक आहे. असे केल्याने त्यांची गरज भागवली जाते. त्यामुळे नाश्त्यात पराठा, चपाती द्यावी. त्याबरोबर उसळ, दही, पराठय़ात पनीर किंवा डाळीचे पीठ टाकावे. कणकेत बेसन, मुगाची डाळ इत्यादी घालून पराठे, थालीपीठ इत्यादी करता येते.

चिक्की, लाडू नेहमी घरात ठेवावेत : दुपारच्या जेवणात शेंगदाणे, बदाम, अक्रोड किंवा चणे इत्यादी देता येतात. हे पदार्थ नुसते आवडत नसतील तर त्याचे चिक्की, लाडू इत्यादी असे रुचकर प्रकार करून देता येतात. प्रथिनांचे सेवन करताना बरोबर कार्बोदकेही दिली पाहिजेत. असे केल्याने आहार संतुलित तर होतोच, पण प्रथिनांना त्यांचे काम करण्यास मदत होते. त्याचबरोबर अती प्रथिने खाल्ल्यामुळे मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो, तो टाळता येतो.

डब्यात फळे द्यावीत : फळे व भाज्या हे मुलांच्या आहारात फार महत्त्वाचे आहे. यातून जीवनसत्त्व, खनिज पदार्थ मिळतात व यामुळे अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर होण्यास मदत होते. फळे मुलांना आवडतात, ती मधल्या वेळेस खायला द्यावीत. बिस्कीट, चिप्स, फराळाचे पदार्थ हे तब्येतीला चांगले. डब्यातून मुलांना फळे दिली पाहिजेत, कारण असे केल्याने जंकफूड खाणे कमी होते. भाज्या खायला मुले कंटाळा करतात.

पालक पुलाव करावा : मुलांना भाज्या खाण्याची सवय लावली पाहिजे. त्याचबरोबर मुलांच्या आवडीच्या पदार्थात वेगवेगळ्या भाज्या घालता येतात. उदा. पराठे वेगवेगळ्या भाज्यांचे करता येतात. कटलेट्समध्ये घालता येतात, पुलावमध्ये पालकाची प्युरी घालून हिरवा पुलाव करता येतो. असे प्रकार रुचकर लागतात व त्यातून भाज्याही खाल्ल्या जातात.

लहान प्लेटमध्ये द्यावे - मुलांना नेहमी लहान प्लेटमध्ये द्यावे, यामुळे अतिरिक्त प्रमाणात खाण्यापासून सुटका होईल. तसेच वजन नियंत्रणात राहील. मुलांना याची जाणीव करून द्या. प्रमाणापेक्षा अधिक खाल्ले जाऊ नये म्हणून लहान प्लेटमध्येच वाढून घ्यावे. यामुळे थोडे थोेडे आणि आवश्यक तेवढेच खाता येते.

खाताना टीव्ही पाहणे टाळावे : खाताना पुस्तक वाचणे, टीव्ही पाहणे किंवा इतर अॅक्टिव्हिटीज करण्याची सवय मुलांमध्ये दिसून येते. त्यामुळे त्यांचे जेवणाकडे लक्ष लागत नाही. अशा वेळी गरजेपेक्षा अधिक खाणे होते. परिणामी, त्यांचे वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच मुलांना नीट, सावकाश जेवायला सांगा. तोंडात घेतलेला घास नीट चावून खायला शिकवा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post