महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी घेतला पदभार
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- गेल्या साडेतीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या नगर महापालिकेच्या आयुक्तपदी सोलापूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहणारे श्रीकांत मायकलवार यांची राज्य शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी सोमवारी (दि.16) नगरला येत आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
महापालिकेचे माजी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे नोव्हेंबर 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचा प्रभारी पदभार होता. नगर विकास विभागाने शुक्रवारी (दि.13) सोलापूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहणारे श्रीकांत मायकलवार यांची नगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली. श्री. मायकलवार यांना तात्काळ सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरुन कार्यमुक्त होत नगर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी सोमवारी (दि.16) नगर येवून आयुक्त पदाची सूत्रे घेतली. प्रारंभी त्यांनी सर्व विभागांच्या अधिकार्यांची ओळख करून घेतली. त्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांच्याशी कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी नगर सचिव एस. बी. तडवी, प्रभाग अधिकारी नाना गोसावी, शेखर देशपांडे आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेत त्यांच्याकडून आयुक्त पदाचा पदभार घेतला.
गेल्या साडेतीन महिन्यांनंतर महापालिकेला श्रीकांत मायकलवार यांच्या रूपाने पुर्णवेळ आयुक्त मिळाले असले तरी ते अवघे 7-8 महिनेच नगरमध्ये राहणार आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त पद पुन्हा रिक्त होणार आहे. यापूर्वीचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनीही अल्पकाळच आयुक्तपद सांभाळले आणि ते नोव्हेंबर 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होणार आहे.
Post a Comment