कोरोना : सारोळा कासारचा वार्षिक यात्रोत्सव, कुस्त्यांचा आखाडा रद्द
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचा ग्रामसभेत निर्णय
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर-नगर तालुक्यातील सारोळा कासार येथिल हजरत निर्गुणशाहवली बाबांचा दि.२९ मार्च रोजी होणारा वार्षिक यात्रोत्सव, दि.३० मार्च रोजीचा कुस्त्यांचा हगामा ‘कोरोना’ साथीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय सोमवारी (दि.१६) सकाळी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. तसेच दर रविवारी भरणारा आठवडे बाजारही पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सरपंच सौ.आरती कडूस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेस पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस, शिक्षकनेते संजय धामणे, तालुका दुध संघाचे संचालक गोराभाऊ काळे, बाजार समितीचे निरीक्षक संजय काळे, उपसरपंच जयप्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजानन पुंड, नामदेव काळे, राजेंद्र कडूस, ग्रामसेवक टी.के.जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी, गावकारभारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील हिंदू-मुस्लीम व इतर सर्व धर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक असलेले ग्रामदैवत हजरत निर्गुणशाहवली बाबांचा वार्षिक यात्रोत्सव (उरुस) दरवर्षी चैत्र पंचमीला साजरा केला जातो. हा वार्षिक यात्रोत्सव आणि कुस्त्यांचा आखाडा संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सारोळा कासारच्या कुस्ती आखाड्यात दरवर्षी राज्यभरातून नामवंत मल्ल हजेरी लावत असतात. या कुस्ती मल्ल विद्येला प्रोत्साहन देण्यासाठी सारोळा ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या इनामी कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांची मोठी गर्दी होत असते. मात्र सध्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ‘कोरोना’ व्हायरसचा उपद्रव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर गावोगावच्या वार्षिक यात्रा, जत्रा, आठवडे बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे या वर्षीचा यात्रोत्सव व कुस्त्यांचा आखाडा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

Post a Comment