कोरोनाचा हाहाकार ; महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका 3 महिने पुढे ढकलल्या
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- देशभरात कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होत आहे. राज्यातही कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 39 वर पोहोचली आहे. यातच आता खबरदारी म्हणून सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तेसेच, याबाबत निवडणूक आयोगाकडे शिफारसदेखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसबद्दल आढावा बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, आपल्याकडे कोरोना व्हायरसची पातळी ही दुसऱ्या स्तरावर पोहोचली आहे. राज्यात अजून कोरोनामुळे तिसऱ्या स्तरावरची परिस्थिती पोहोचली नाही. राज्यातील कोरोनाचा कहर पाहता राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करुन सर्व विद्यापीठ परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. उद्यापासून राज्यातील सर्व विद्यापीठ महाविद्यालय, इंजिनिअर यासह वेगवेगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे. ज्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे त्या एप्रिल महिन्यात घेण्यात येतील.
निवडणूका पुढे ढकलल्या
राज्यात काही दिवसात महापालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. अनेकांनी कोरोनाची गंभीरता पाहता, निवडणूका पुढ ढकलण्याची मागणी केली होती. याबाबत बोलताना टोपे म्हणाले की, कोरोना व्हायरसची परिस्थितीत पाहत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्यात यावा असा निर्णय राज्य सरकारचा झाला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली आहे. निवडणूक आयोग यावर आपला निर्णय लवकर घेतली.
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 39
महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे 6 नवे रुग्ण सापडले. पुण्यात आणखी एक कोरोना रुग्ण मिळून आला आहे. आबुधाबी येथून प्रवासी पुण्यात आला होता, यासोबतच राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची आकडेवारी 39 झाली आहे. यात पुणे, मुंबई आणि औरंगाबादच्या एका नवीन रुग्णाचा समावेश आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना राज्यातील परिस्थितीची माहिती देताना सांगितले की, वैद्यकीय नमुने तपासणीसाठी राज्यात लॅबची संख्या वाढवण्यात येत आहे. सोबतच, एमपीएससी परीक्षाही पुढे ढकलण्याची सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू
मुंबईत जमावबंदी कलम 144 लागू. मुंबईतील टूर ऑपरेटर्सना 31 मार्चपर्यंत कोणत्याही टूर्सचे आयोजन करू नये अशा सूचना दिल्या आहेत. तसेच, 19 मार्च ते 31 मार्चपर्यंत सर्व सिनेमा, टीव्ही शो, जाहिराती, वेब शोचे शूटिंग बंद करण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजसह इतर संघटनांनी घेतला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. या क्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Post a Comment