गुटखा, माव्याची अहमदनगर शहरात खुलेआम विक्री


पैसे घेऊन गुटखा विक्रीला अभय देणार्‍या पोलिसावर कारवाई करावी; मुख्यमंत्र्यांना निवेदन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शासनाने बंदी घातलेली असतानाही नगर शहर आणि परिसरात गुटखा, मावा, तंबाखूची राजरोसपणे विक्री होत असून या व्यसनांमुळे अनेकजण मोठमोठ्या आजाराला बळी पडत आहेत. तरुण पिढी या वासनांच्या आहारी जात आहे. गुटख्याची बेकायदेशीर विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिस त्यांच्याकडून ‘वसुली’ करत आहेत. गुटखा, मावा, तंबाखू विक्रीचा व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सेक्रेटरी एन. आय. पवार यांनी म्हटले आहे की, शहरात गुटख्याची सर्रासपणे बेकायदेशीर विक्री केली जात आहे परंतु या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिस अधिकार्‍यांच्या नावाखाली एक पोलिस कॉन्स्टेबल हजारो रुपये वसूल करत आहे. एलसीबी पथकातील या पोलिस कॉन्स्टेबलने जमा केलेले पैसे सर्व जण वाटून घेतात. या सर्वांची सीबीआयमार्फत चौकशी करून वसुली करणार्‍या संबंधित पोलिस कॉन्स्टेबलवर कारवाई करावी.

गुटखा, मावा, तंबाखूची सर्रासपणे खुलेआम विक्री होत असल्याबाबत पोलिस अधिकारी, पालकमंत्री, आमदार, खासदार या सर्वांना माहिती आहे. परंतु कारवाई होत नाही. त्यामुळे युवा पिढीला वाचविण्यासाठी आपणच पुढाकार घेऊन संबंधित विक्रेते आणि पैसे घेणार्‍या पोलिसावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करतानाच ज्या लोकांविरुद्ध तक्रार केली आहे ते माझ्या विरोधात खोट्या केसेस टाकून खोट्या गुन्ह्यात अडकवू शकतात. परंतु युवा पिढीला वाचविण्यासाठी आपण संबंधितांवर कठोर कारवाई करावी. सरकार कोणालाही माफ करणार नाही, अशी अपेक्षा पवार यांनी या निवेदनातून व्यक्त केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post