शिवसेनेचे नेते महाआघाडीसाठी आ. जगताप यांच्या कार्यालयात!
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येवून महाआघाडी करत सत्ता स्थापन केलेली आहे. त्याच धर्तीवर नगरमध्येही महाआघाडी व्हावी यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या प्रभाग 6 मधील एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने या महाआघाडीचा श्रीगणेशा व्हावा यासाठी उपनेते अनिल राठोड व शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना बाजुला ठेवत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यासह नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.3) आ. संग्राम जगताप यांच्या कार्यालयात जावून आ. संग्राम जगताप यांच्यासह पदाधिकार्यांशी चर्चा केली.
संपर्क प्रमुख कोरगावकर यांच्यासह नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, विजय पठारे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, प्रशांत गायकवाड, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, संजय शेंडगे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, महिला आघाडीच्या रेश्मा आठरे, नगरसेवक गणेश भोसले, कुमार वाकळे, संपत बारस्कर, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, सुनील त्र्यंबके, विनीत पाऊलबुधे, बाबासाहेब गाडळकर, संभाजी पवार, डॉ. सागर बोरुडे, विपूल शेटिया, शिवाजी चव्हाण, किरण कटारिया, अमोल गाडे, संतोष ढाकणे, माऊली जाधव, वैभव ढाकणे, मनिष फुलडहाळे आदी पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
यावेळी बोलताना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर म्हणाले, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाआघाडीचे सरकार सत्तेवर आहे. या सरकारकडून राज्यातील सर्व स्तरातील जनतेची विधायक कामे केली जात आहेत. याच धर्तीवर नगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आल्यास शहराचे चित्र बदलणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण राष्ट्रवादीच्या कार्यालयात चर्चेसाठी आलेलो आहोत. यापुर्वी शहराच्या राजकारणात जे झाले त्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा झाले गेले विसरुन एकत्र येवून शहर विकासाला चालना देण्याची गरज आहे. प्रभाग 6 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही. या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असून त्याच्या विजयासाठी महाआघाडीच्यावतीने सर्वांनी प्रयत्न करत नगर शहरातही महाआघाडीचा श्रीगणेशा करावा असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा नियोजन सारखा धोका नको
राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर लगेचच जिल्हा नियोजन समितीची निवडणूक झाली. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात होते. मात्र अखेरच्या क्षणी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी धोकेबाजी करत महाआघाडीला सुरुंग लावला. अशा प्रकारचा धोका यापुढे होऊ नये याचा शब्द द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी यावेळी संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्याकडे केली त्यावर यापुढील काळात असे घडणार नसल्याची ग्वाही कोरगावकर यांनी दिली.
शहर प्रमुखांची अनुपस्थिती चर्चेचा विषय
नगर शहरात महाआघाडीचा प्रयोग राबविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते उपस्थित नव्हते. त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे. शहर शिवसेनेस गटबाजी उफाळली असल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत स्पष्ट झाले होते. शिवसेना उपनेते अनिल राठोड व शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना मानणारा एक गट तर काही नगरसेवकांचा दुसरा गट अशी गटबाजी शिवसेनेत सुरू आहे. राठोड समर्थक गट राष्ट्रवादी बरोबर जुळवून घेण्यास अनुत्सुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खरच शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येणार का? याबाबत उत्सुकता आहे.
भाजपानंतर शिवसेनाही मदतीसाठी राष्ट्रवादीकडे
महापालिकेच्या सार्वत्रित निवडणुकीत अवघ्या 14 जागा जिंकणार्या भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावरच महापालिकेत शिवसेनेला बाजुला ठेवत सत्ता स्थापन केलेली आहे. भाजपाने सत्तेसाठी राष्ट्रवादीची मदत घेतल्यानंतर आता पोटनिवडणुकीतील विजयासाठी शिवसेनेनेही राष्ट्रवादीकडे मदत मागितली आहे. त्यामुळे आता शहर राष्ट्रवादी आणि विशेषता आमदार संग्राम जगताप हे पुर्वीचा राजकीय मित्र असलेल्या भाजपाला या निवडणुकीत मदत करणार की राज्यात नव्याने निर्माण झालेल्या राजकीय समीकरणातील मित्र बनलेल्या शिवसेनेला मदत करणार? याबाबतही नगरच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
Post a Comment