भरचौकात प्राध्यापक तरुणीला अंगावर पेट्रोल ओतून जाळले



माय अहमदनगर वेब टीम
नागपूर – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे भरचौकात दिवसाढवळ्या तरुणीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. संबंधित तरुणी 40 टक्के भाजली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना हिंगणघाट परिसरातील नंदोरी चौकात घडली आहे. पीडित तरुणी तुळसकर कॉलेजची प्राध्यापिका आहे. तर आरोपी विकेश नगराळे आणि इतर दोघे घटनास्थळावरून पसार झाले होते. परंतु, पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये मुख्य आरोपीला अटक केली. त्याच्यासोबत आणखी दोन जण कोण होते याचा देखील शोध घेतला जात आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. ट्विट करून त्यांनी यासंदर्भात माहिती देताना कठोर कारवाईचे आश्वासन दिले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पीडित तरुणीचा चेहरा पूर्णपणे भाजला आहे. तसेच शरीराच्या उर्वरीत भागांवर सुद्धा अतिशय गंभीर जखमा आहेत. तिची अवस्था अतिशय चिंताजनक आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या घटनेतील मुख्य आरोपी हा विवाहित आहे. तसेच तो नेहमीच बसमध्ये जात असताना पीडितेचा पाठलाग करायचा. काही दिवसांपूर्वी त्याने तरुणीशी बोलण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तरुणीने याचा विरोध केला आणि दोघांमध्ये वाद झाला. यानंतर सोमवारी सकाळी ती दैनंदिन प्रमाणेच कॉलेजला जात होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post