‘मॅक्सिमस हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत चांगदेव लाटे, स्मिता उकिर्डे, किशोर मरकड, जनाबाई हिरवे यांनी पटकाविला प्रथम क्रमांक


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – ‘हम फिट तो नगर फिट’ असा नारा देत पहाटे कडाक्याच्या थंडीत सुमारे साडेतीन हजार स्पर्धक मॅक्सिमस नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन मध्ये धावले. समाजाला आरोग्याप्रती व कॅन्सर विषयक जागृती करण्यासाठी आयोजित व महाराष्ट्र अॅथेलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 21 कि.मी., 10 कि.मी. तसेच 3 व 5 कि.मी.या चार गटात ही स्पर्धा झाली.

ऑलंम्पिक खेळाडू ललिता बाबर, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्र.पोलीस अधिक्षक सागर पाटील, कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, छायाताई फिरोदिया, आशाताई फिरोदिया, रेखा सारडा, नगर रायझिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, स्पर्धा संयोजक संदीप जोशी, डॉ. सतीश सोनवणे, डॉ.शाम तारडे, अॅड.गौरव मिरीकर, अॅथेलिटिक्स असो.चे दिनेश भालेराव, मनपा नगर रचनाकार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून चार गटातील मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.

झुंबा डान्सची धमाल रनर्सनी अनुभवली. तर आर्मीच्या बॅण्ड पथकासह विविध लावण्यात आलेल्या प्रेरक हिंदी गीतांनी रनर्सचा उत्साह वाढवला. मॅरेथॉनच्या प्रारंभी नगर रायझिंगचे गीत वाजविण्यात आले. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी काही महिला चक्क नऊवारी साडी परिधान करुन या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाल्या. तिरंगा ध्वज घेऊन एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आलेले रनर्स या मॅरेथॉनचे आकर्षण ठरले. जगातील अतीशय खडतर मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे भारताचे रनर्स चंद्रकांत पाटील, मनोज देशपांडे, तुकाराम नाईक, सुरेंद्र ब्रम्हे, जस्मीत वधवा, चेतन नवलानी, मीना पोटे पेसर म्हणून सहभाग लाभला. स्पर्धेच्या समारोपनंतर नगर क्लबच्या मैदानावर लगेचच ऑलंम्पिक खेळाडू ललीता बाबर हिच्या हस्ते रनर्सना बक्षिस देण्यात आले.

यामध्ये 21 कि.मी. पुरुष गटामध्ये प्रथम- चांगदेव लाटे (नगर), द्वितीय- समित भूकेर (बीटीआर), तृतीय- कार्तिक कुमार (बीटीआर), महिला मध्ये प्रथम- स्मिता उकिर्डे, द्वितीय- भारती यादव, तृतीय- अनिता बोथरा (तिन्ही रा. नगर), तर 10 कि.मी. पुरुष गटात प्रथम- किशोर मरकड (पाथर्डी), द्वितीय- महेंद्र कुमार, तृतीय- विशाल ढगे, महिलांमध्ये प्रथम- जनाबाई हिरवे (सातारा), द्वितीय- शितल भंडारी (पारनेर), तृतीय- नेहा खान (नगर) यांनी बक्षिसे पटकाविली. सदर स्पर्धेचा अंतिम व संपूर्ण निकाल 15 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.

मुख्य संयोजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, नगरमध्ये क्रीडा संस्कृती वाढीस लागावी, प्रत्येकाने आरोग्याप्रती जागृत रहावे या उद्देशाने पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉनच्या धर्तीवर नगरमध्ये मॅरेथॉनची मुहूर्तमेढ रोवली होती. यंदा या सलग सहाव्या वर्षी नगरकरांनी या स्पर्धेला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. आरोग्याप्रती जनजागृतीचे काम फाऊंडेशनने घेतले असून, या चळवळीला नगरकर स्वयंफुर्तीने सहकार्य करीत असल्याचे सांगून, पुढील 2021 ची सातव्या सिझनची हाफ मॅरेथॉन 7 फेब्रुवारी होणार असल्याचे जाहीर केले.

आ.संग्राम जगताप यांनी मॅरेथॉन स्पर्धेस भेट देऊन विजेत्या व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा देऊन आरोग्याप्रती जागृक राहण्याचे आवाहन केले.

यावेळी स्पर्धेतील रनर्सच्या चेस्ट नंबच्या आधारे लकी ड्रॉ काढण्यात आले. यामध्ये भाग्यवान विजेते ज्योतीराज शिंदे, उमेश व्यवहारे, ज्ञानेश्‍वर मोरे, ओम ढवळे, दिपा मोहळे, महेश घोडके, नवीन कुमार, जितेंद्र मराठे यांना सायकल बक्षिस देण्यात आले. पोलिस दल, स्वयंसेवकांची फळी आणि नगरकरांचा प्रतिसाद यामुळे संपूर्ण स्पर्धेतून शिस्तीचे दर्शन घडले. प्रत्येकाने नगर रायझिंगच्या टिमचे आभार मानत एका चांगल्या उपक्रमात सहभागी होता आल्याचा आनंद व्यक्त केला.

या स्पर्धेसाठी जगदीप मक्कर, अतुल डागा, योगेश खरपुडे, गौतम जायभाय, जितेश माखीजा, संदिप कुसळकर, अमित बुरा, डॉ.महादेव रंधाळे, सुमेर सिंग, धनेश खत्ती आदींनी महत्वपूर्ण योगदान दिले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस दल, भारतीय लष्कर, विखे पाटील फिजिओथेरपी डिपार्टमेंट, शहरातील विविध हॉस्पिटल, एसपीजी इव्हेंट मॅनेजमेंट, युवान, हॉटेल आयरिश प्रिमीयर, नगर रायझिंग रनर्स क्लब, रेडिओ सिटी, वेलो स्कोप, टीटेन ऍप्रल, नगर क्लब, टाऊन स्क्रिप्ट, फास्ट अॅण्ड अप आदींनी सहकार्य केले. मॅरेथॉन नंतर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post