घाबरण्याचे कारण नाही



माय अहमदनगर वेब
नवी दिल्ली -शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी त्यांचे पुत्र व राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुमारे सव्वा तास दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. या भेटीनंतर पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, नागरिकत्व दुरुस्ती कायदा -सीएए व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी-एनपीआरबद्दल कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीशी कसलेही मतभेद नसल्याचेही ठाकरेंनी सांगितले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर आले होते. राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे हे माझे लहान भाऊ असल्याचे म्हटले होते. तोच धागा पकडत ठाकरे म्हणाले, मोठे बंधू मोदी यांच्याशी राज्याच्या विकासासाठी सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. सीएए, एनपीआर व एनआरसीवरही चर्चा झाली. सीएएला घाबरण्याचे कारण नाही. याबाबत मोदींनी भरवसा दिला आहे. एनआरसी देशभरात लागू होणार नसल्याचे संसदेतच केंद्राने स्पष्ट केले आहे. एनपीआर हे देशातून कोणाला हुसकावून लावण्यासाठी नाही, असे ते म्हणाले. उद्धव-आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री अमित शहा व ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेतली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post