१३५ वर्षे धडधडणारी जळगावातील पहिली प्रिंटिंग प्रेस होणार इतिहासजमा





माय अहमदनगर वेब टीम
जळगाव - जळगावच्या इतिहासाची साक्षीदार असलेली व तब्बल १३५ वर्षे धडधडणारी बाबजी स्टीम प्रिंटिंग प्रेस लवकरच इतिहासजमा होणार आहे. देशातील प्रसिद्ध अशा वस्तुसंग्रहालयाला या प्रिंटिंग प्रेसमधील यंत्रसामग्री भेट देण्याच्या हालचाली फडणीस कुटुंबीयांकडून सुरू आहेत.

देशात मुद्रण व्यवसायात फार प्रगती झाली नव्हती त्या स्वातंत्र्यपूर्व काळात जळगावातील नवीपेठेत बाबजी स्टीम प्रिंटिंग प्रेस १८८० मध्ये नारायण नरसिंह फडणीस यांनी सुरू केली. जळगाव जिल्ह्यातील पहिली व राज्यातील ही तिसरी प्रिंटिंग प्रेस. शहराच्या अत्यंत वर्दळीच्या भागात दुमजली इमारतीत ही प्रेस सुरू झाली. जळगाव शहरातील अनेक राजकीय, सामाजिकसह विविध क्षेत्रांतील अनेक घटना, घडामोडींची साक्षीदार असलेली ही प्रेस आहे. खिळे जुळवून छपाईचे काम येथे केले जात असे. १३५ वर्षे या यंत्राची धडधड जळगावात अव्याहतपणे सुरू होती. स्वातंत्र्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाची कास देशाने धरल्याने हळूहळू छपाईच्या तंत्रातही बदल झाले. खिळ्यांची जागा आधुनिक यंत्राने घेतल्याने हे यंत्र मागे पडू लागले. आता तर हे यंत्र व तंत्र इतिहासजमा झाले आहे.


लंडन, जर्मनीहून मागवली यंत्रसामग्री

स्वातंत्र्यपूर्व काळात भारताने तंत्रज्ञानात फार अशी प्रगती केली नव्हती, त्यामुळे नारायण फडणीस यांनी प्रिंटिंग यंत्र जर्मनीहून, तर पेपर कटिंग यंत्र लंडन येथून मागवल्याचे त्यांचे नातू महेश फडणीस व राहुल नामजोशी सांगतात. पुढे लुधियाना येथूनही यंत्र मागवले. त्याद्वारे जळगावात छपाई सुरू झाली. ‘काव्यरत्नावली’ या मासिकाचा जन्मही या बाबजी स्टीम प्रिंटिंग प्रेसमध्येच झाला. १८८० ते १९३७ पर्यंत हे मासिक प्रसिद्ध झाले. त्यानंतर काही अडचणींमुळे मासिक बंद पडले. पुढे जळगावातील डीएसपी चौकाचे ‘काव्यरत्नावली’ असे नामकरण झालेे. काव्यरत्नावली मासिक प्रसिद्ध असल्याने काव्यरत्नावलीकार नारायण फडणीस असे नारायणरावांना आेळखले जायचे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post