'त्या' तरुणीचा सर्व वैद्यकीय उपचार खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याच्या करण्यात आलेल्या प्रयत्नाची गंभीर दखल घेतली असून दोषीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा अशा सूचना दिल्या आहेत.तसेच, जखमी तरुणीवर योग्य ते उपचार करावेत आणि उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येईल असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण ?
सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली. तरुणीला पेटवल्याचे पाहताच काही शाळकरी मुलींनी आरडाओरड करीत जवळपासच्या मदतीची याचना केली. त्या वेळी धावत येऊन नागरिकांनी तत्काळ तरुणीच्या अंगावर पाणी ओतून आग विझविली. या घटनेत ही तरुणी 40 टक्के भाजली असून नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत आहे. विशेष म्हणजे आरोपी विकेश ऊर्फ विकी नगराळे (29) विवाहित असून एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
तरुणी चौकात उतरून पायी जात असताना पेट्रोल ओतून लावली आग
हिंगणघाट येते भरचौकात तरुणीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले. विकेश नगराळे नामक या आरोपीला कोर्टाने 8 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी विकेश हा विवाहित असून गेल्या अनेक दिवसांपासून पीडितेचा पाठलाग करत होता. पीडित तरुणीची प्रकृती सध्या अत्यवस्थ असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. हिंगणघाट येथील घटनेच्या विरोधात स्थानिकांनी बंद पुकारला आहे.
लोकसभेत गाजला हिंगणघाटचा मुद्दा

हिंगणघाटच्या घटनेचे पडसाद लोकसभेत उमटले आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार नवनीत कौर राणा यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. तसेच आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली. इतरही लोकसभा सदस्यांनी या घटनेचा निषेध केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post