बालसाहित्यिकांनी आपल्या सभोवतालचे भान ठेवावे – संमेलनाध्यक्ष ल.म.कडू


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - बालसाहित्याचे लेखन करतांना लेखकांनी आपल्या सभोवतालचे भान ठेवावे व आपले पणाची भावना निर्माण करणारे साहित्य लिहावे असे आवाहन जेष्ठ बालसाहित्यिक, चित्रकार साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक ल.म.कडु यांनी केले.

मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद सावेडी उपनगर शाखा आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन आयोजित विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष पदावरून ते बोलत होते.

स्वागताध्यक्ष तथा मसाप सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हा पोलीस उप अधीक्षक संदिप मिटके, शीतल जगताप, मसाप सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलूलकर, डॉ. संजय कळमकर, प्रा. शशिकांत शिंदे, उपशिक्षण अधिकारी संजय मेहेर, भालचंद्र बालटे, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जे.एन.पठाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना संमेलनाध्यक्ष ल.म.कडू म्हणाले की, विद्यार्थी साहित्य संमेलनानिमित्त मराठी भाषेची पालखी वाहणारे असंख्य भोई याठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे मराठी भाषेची काळजी करण्याची गरज वाटत नाही. इंग्रजी भाषा हे वाघिणीचे दूध आहे तर मराठी भाषा हे आईचे दूध आहे. इंग्रजी भाषा शिकणे गरजेचे आहे मात्र तिचे अवडंबर करू नका असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपला लेखक व चित्रकार होण्यापर्यंतचा प्रवास उलगडून दाखविला.

स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याला अनेक मोठ्या साहित्यिकांची देन लाभली आहे. वाचन संस्कृती वाढण्यासाठी मसाप सावेडी उपनगर शाखेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. संजय कळमकर म्हणाले की, मराठी राजभाषा दिनानिमित्त आज आपण वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसाबरोबरच आपली आई असणारी मराठी भाषेचा वाढदिवस साजरा करीत आहोत. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी मराठीतूनच बोलले पाहिजे. मराठी भाषा आपल्या हृदयातून उमटते. महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून द्यावा असे ते म्हणाले. तसेच सर्व परिपत्रके मराठी भाषेतूनच काढावी असे ते म्हणाले. यावेळी उपशिक्षणाधिकारी संजय मेहेर, महापौर बाबासाहेब वाकळे, शितल जगताप यांचीही भाषणे झाली.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथ पूजनाने विद्यार्थी साहित्य संमेलनाचे शानदार उदघाटन झाले. ग्रंथदिंडी मध्ये फुलांनी सजविलेली पालखी, ग्रंथ, विद्यार्थ्यांचे ढोल पथक, झांज पथक, बँड पथक, विविध महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अभिनेते श्रेणीक शिंगवी व मृणाल कुलकर्णी, शशिकांत नजाण यांनी उमेश घेवरीकर लिखित मराठी भाषा समृद्ध करण्याचे आवाहन करणारे प्रहसन सादर केले. उत्कृष्ट बालवक्ता स्वयंम शिंदे, राज्यभरात समाज माध्यमातून जिच्या सुंदर हस्ताक्षराचे कौतुक होत आहे अशी सात्रळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ३ री तील विद्यार्थिनी श्रेया सजन, मुग्धा घेवरीकर व राधिका वराडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शेवगावच्या बाळासाहेब भारदे विद्यालयाची विद्यार्थिनी व बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिनयाचे पाहिले रौप्य पदक विजेती विद्यार्थिनी कलावंत मुग्धा घेवरीकर हिने राजकुमार तांगडे लिखित ‘पिंटी’ हा शेतकऱ्यांच्या मुलीचे भावविश्व साकारणार एकपात्री प्रयोग सादर केला. लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमात प्रा. शशिकांत शिंदे यांच्याशी स्नेहल उपाध्ये यांनी संवाद साधला. बक्षिस वितरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

मसाप सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलूलकर यांनी प्रास्ताविक केले. शारदा होशिंग यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष पवार यांनी आभार मानले.

दुसऱ्या सत्रात विविध स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन, कथाकथन व निबंध वाचन केले. विद्यार्थी साहित्य संमेलनास विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनाच्या यशस्वितेसाठी सुदर्शन कुलकर्णी, दिपाली देऊतकर, अनिरुद्ध तिडके, कार्तिक नायर, तेजा पाठक, विनायक वराडे, विजय पिंपरकर, नंदा मांडगे, शांभवी जोशी, निखिल डफळ यांनी परिश्रम घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post