मराठीचे आईपण जपणे आपल्याच हाती- सौ.राजश्री घुले


जि प शिक्षण विभागाच्यावतीने काव्यतरंग काव्यवाचन स्पर्धा संपन्न
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- "जागतिक मराठी भाषा गौरव दिनी आपण प्रत्येक मराठी माणसाने संकल्प करणे गरजेचे आहे की मराठीचा सन्मान वाढविण्यासाठी आपण मराठी लिहिले, वाचले, बोलले, ऐकले व जगले पाहिजे.

आईच्या तोंडून आपण जी भाषा शिकतो ती आपली मातृभाषा होय अशा मायबोलीच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने खडतर कष्ट करणे आवश्यक आहे. जगाच्या भाव भावना व व्यवहार आपल्याला कळण्यासाठी मातृभाषे पासूनच आपल्या जीवनाची सुरुवात होते म्हणून मराठीचे आईपण जपणे आपल्याच हाती आहे."असे प्रतिपादन जिल्हा परिषद अहमदनगरच्या अध्यक्षा नामदार सौ. राजश्री घुले पाटील यांनी केले.

जि प शिक्षण- प्राथमिक च्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जि प च्या शिवाजी महाराज सभागृह मध्ये संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बालकाव्यवाचन -काव्यतरंग स्पर्धा 2020 च्या उद्घाटन प्रसंगी सौ घुले बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री रमाकांत काठमोरे (शिक्षणाधिकारी, प्राथमिक) श्री अरुण धामणे (उपशिक्षणाधिकारी प्राथमिक), कवी प्रा. शशिकांत शिंदे, कवी कैलास दौंड, कवी दादासाहेब होते, कवी तुकाराम धांडे, श्री साठे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शालेय पाठ्यपुस्तकात कविता असलेले कवी साक्षात समोर मंचावर पाहून विद्यार्थी देखील अवाक झाले व त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी पुढे सरसावले.

प्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते श्री सरस्वती प्रतिमा पूजन व ज्येष्ठ श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन संपन्न झाले.मान्यवरांच्या शुभहस्ते बालभारती व कुमारभारतीतल्या सर्वोत्तम 100 कवितांच्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. स्वागत श्री धामणे यांनी तर प्रास्ताविकात श्री काठमोरे यांनी विशद केले की "काव्यरंग 2019 बाल काव्यसंग्रहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बालकवींच्या कविता व चित्रशैलीला प्रोत्साहन देण्यात आले होते. यावर्षीच्या मराठी राजभाषा गौरव दिनामध्ये मुलांच्या काव्यप्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी तालुका व केंद्र पातळीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी लिहिते व्हावे, त्यांचा शब्दसंग्रह वाढावा व त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत समृद्ध व सकारात्मक बदल घडावा असा या उपक्रमापाठीमागील हेतू आहे."

कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रथित यश कवींनी आपल्या रचना सादर केल्या व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त दाद दिली.

तालुकास्तर व केंद्र स्तरावरील काव्यवाचन स्पर्धातून सुमारे 14 तालुक्यातून दोन गटातून प्रत्येकी दोन दोन विजेते विद्यार्थी कवींच्या काव्य वाचनाने कार्यक्रमात रंगत आणली. शेती, शेतकरी, मुली वाचवा, माझी सुंदर शाळा ,दुष्काळ, पाणी वाचवा स्त्री सबलीकरण आदी विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता बालकवींनी बहारदार पद्धतीने मांडल्या.कुणी गाऊन कविता म्हटलं तर कुणी खड्या आवाजात गद्य पद्धतीने कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. रंगीबिरंगी फुगे व आकर्षक स्टेज सजावट, बालभारती कुमारभारती मधील प्रसिद्ध कवितांचे पोस्टर प्रदर्शनाने बालकवींची मने जिंकली.

काव्यतरंग काव्यवाचन स्पर्धेसाठी श्री राजेश जगताप ,श्री राजेंद्र ठाणगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले. तर आभार श्री साठे यांनी मानले. प्रत्येक बालकविला आयोजकांच्या वतीने डायरी पेन व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना उत्कृष्ट वाचनीय पुस्तकांची भेट देण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती.

काव्यवाचन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
छोटा गट
१)आराध्या दळवी जिप प्रा शाळा नेवासा बु ता नेवासा (होळी)
२) राधिका वाघ जिप प्रा शाळा निमगाव ता श्रीरामपूर(आकड्यांची गम्मत)
३)संस्कार पाटोळे जिप प्रा शाळा दिघेवस्ती ता राहुरी (सुट्टीची धमाल)

मोठा गट
१)निकिता विखे जिप प्रा शाळा गायकवाड जळगाव ता शेवगाव (माझी मराठी)
२) आरती हंडाळ जिप प्रा शाळा हंडाळवाडी ता पाथर्डी (पावसाळा)
३) सिद्धार्थ गायकवाड जिप प्रा शाळा पिप्री लौकई ता राहता (पाणी)

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post