निर्भया बलात्कार प्रकरण ; नराधमांच्या फाशीवर पुढील आदेशापर्यंत


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली: संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या दिल्लीतील निर्भया बलात्कार व नृशंस हत्याकांडातील नराधमांची फाशी पुन्हा लांबणीवर पडली आहे. दिल्लीतील पाटियाला हाऊस न्यायालयाने या फाशीवर अनिश्चित काळासाठी म्हणजे, पुढच्या आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. दुस-यांदा अशाप्रकारे निर्भया बलात्कारांच्या फाशीवर स्थगिती देण्यात आली आहे.

दोषी आरोपी विनय शर्माने फाशीला स्थगितीची मागणी करणारी याचिका पटियाला हाऊस न्यायालयात केली आहे. राष्ट्रपतींकडे दया याचिका प्रलंबित असल्याने फाशीला स्थगिती द्यावी, असे विनय शर्माचे म्हणणे आहे. तर आणखी एक दोषी आरोपी पवनने अल्पवयीन असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पवनची ही याचिका फेटाळली गेली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांना शनिवारी (१ फेब्रुवारी) सकाळी ६ वाजता फासावर लटकवण्यात येणार होते. मात्र पटियाला हाऊस न्यायालयाकडून फाशीवर स्थगिती देण्यात आल्याने या नराधमांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. यापूर्वी २२ जानेवारीला सकाळी सात वाजता निर्भयाचे चारही मारेकरी फासावर लटकवले जाणार होते. मात्र त्यावेळी दोषी असलेल्या मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यांकडे दया याचिकेची मागणी केली होती. मात्र राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानुसार अक्षय ठाकूर (३१), पवन गुप्ता (२५), मुकेश सिंह (३२) आणि विनय शर्मा (२६) यांच्या नावे नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आले. या डेथ वॉरंटनुसार तिहार तुरुंगात चारही दोषींना १ फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता एकाचवेळी फाशी दिली जाईल, असा निर्णय दिल्लीतील पाटियाला न्यायालयाने दिला होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post