ऐतिहासिक वास्तू नाट्यगृह व विश्रामगृहासाठी मोठी तरतूद


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ साठीची वित्तीय मर्यादा सर्वसाधारण आराखड्यासाठी ३८१ कोटी रुपयांची ठरवून देण्यात आली होती. यात ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व संरक्षण यासाठी १२ कोटी, नगर शहरातील नाट्यगृहासाठी ५ कोटी रुपये आणि नगर शहरात चांगले शासकीय विश्रामगृह बांधकामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला.  उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या प्रारुप आराखड्यासंदर्भात बैठक घेतली. ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील आदी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी मागणी केल्याने आणि पालकमंत्री मुश्रीफ यांनी सर्वसाधारण योजनेच्या आराखड्यात अधिक तरतूद देण्याची मागणी केल्याने पवार यांनी यापूर्वी ठरवून दिलेली ३८१ कोटी रुपयांच्या मर्यादेत वाढ करुन ती ४७५ कोटी रुपये करण्याचा निर्णय जाहीर केला. जिल्हाधिकारी कार्यालय इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर असून त्यासाठीच्या उर्वरित कामांसाठी २६ कोटी निधी मंजूर झाला आहे.  मात्र, केवळ ४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित निधी देण्याची मागणी पालकमंत्री मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केली. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून  तो निधी उपलब्ध करुन देण्याचे पवार यांनी मान्य केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post