अहमदनगरमध्ये खड्डे पॅचिंगच्या कामात घोटाळा?


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तक्रार; त्याच रस्त्यांवरील खड्ड्यांचे पुन्हा पुन्हा पॅचिंग

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरात महापालिकेच्यावतीने रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सध्या सुरू असून त्याच रस्त्यांवर खड्ड्यांचे पुन्हा पुन्हा पॅचिंग केले जात असल्याने या कामाबाबत संशय निर्माण झाला आहे. सात महिन्यात तीन निविदा काढून तीच तीच कामे केली जात असल्याने यामधील मोठा आर्थिक घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप मनसेच्यावतीने करण्यात आला आहे.

याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नितीन भुतारे, इंजि. विनोद काकडे, मनोज राऊत, रतन गाडळकर, गणेश शिंदे, गणेश मराठे, अंबादास गोटीपामूल, अभिनव गायकवाड आदींनी रस्त्याच्या पॅचिंगच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करुन निदर्शने केली. यावेळी बोलताना नितीन भुतारे म्हणाले, महापालिकेने रिलायन्स कंपनीच्यावतीने केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई केल्याने त्या रस्त्यांचे पॅचिंग करण्यासाठी महापालिकेला निधी दिला होता. त्या निधीतून रस्ते पॅचिंगसाठी 24 लाख रुपयांची निविदा काढण्यात आली. या निविदेनुसार शहरातील व उपनगरातील 20 रस्त्यांचे पॅचिंगचे काम पुर्ण करण्यात आले. त्याबाबतचा काम पुर्णत्वाचा दाखला 2 सप्टेबर 2019 रोजी देण्यात येवून बिलही काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा 36 लाख व 22 लाख अशा दोन वेगवेगळ्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदांमधूनही पुर्वी पॅचिंग केलेल्या रस्त्यांचेच पॅचिंगचे काम सध्या सुरू आहे. एकदा पॅचिंग केलेल्या रस्त्याच्या दोषदायित्वाची मुदत 24 महिने असताना पुन्हा अवघ्या 6 महिन्यातच पॅचिंग कसे केले जात आहे? याचाच अर्थ सहा महिन्यापुर्वी केलेले काम निकृष्ट दर्जाचे असावे किंवा काही ठिकाणी कामच न करता बिल काढले असावे, अशी शक्यता आहे.




महापालिकेतील अधिकारी व ठेकेदार हे संगनमताने नागरिकांच्या कररुपी पैशावर डल्ला मारत असून याबाबत माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार थेट नाशिक विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे भुतारे यांनी सांगितले. तसेच नागरिकांच्या पैशाच्या केल्या जात असलेल्या गैरवापराविरोधात मनसेच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post